सांगली : रेंगाळलेला परतीचा मान्सून, पहाटेचे पडत असलेले धुके यामुळे आले, हळद या कंदवर्गिय पिकामध्ये कंदकुजचा धोका बळावला असून अतिपाण्याने पानेही पिवळी पडत आहेत. यामुळे उत्पादनात २० ते २५ टक्के घट येण्याची भीती उत्पादक शेतकरी वर्गातून होत आहे.
सांगली जिल्ह्यात नगदी पीक म्हणून हळदीचे पीक पारंपरिकतेने घेतले जाते. तसेच गेल्या चार-पाच वर्षापासून कडेगाव, कडेपूर, ताकारी भागात आले पिकाची लागवडही वाढली आहे. बाजारात आल्याला मोठी मागणी असल्याने आणि नगदी पीक असल्याने लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.
या वर्षी मे महिन्यात लागण केलेली पिके आता आठ ते दहा पानावर आहेत. ही पिके प्रामुख्याने वरूंबा पद्धतीने करावी लागतात. कंद पोसण्यास आवश्यक माती मिळावी या हेतूने वरूंब्यावर लागण केली जाते. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने वरूंब्याच्या रानात पाण्याची साठवण जास्त झाली आहे. पाणी निचरा करण्यास वावच मिळालेला नाही. रानात ओली सुकत आली की पुन्हा जोरदार पाऊस पडत असल्याने रानात निचराच होऊ शकलेला नाही. तसेच काही रानात नीर लागण्याच्या म्हणजेच पाझर लागण्याचे प्रकारही पाहण्यास मिळत आहेत. यामुळे पाण्याचा निचराच न झाल्याने आले व हळदीचे कोवळे कंद कुजू लागले आहेत.
याशिवाय पानेही अतिपाण्यामुळे पिवळी पडू लागली आहेत. कंदाच्या सुरळीतील कोंबच पिवळे पडत असल्याने कंदामध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रियाच खंडित होत आहे. यामुळे कंद कुजीबरोबरच कंद पोचट होणे, कंदाची वाढ खुंटणे आदी प्रकार घडत असून हळद व आल्याचे कोंब निस्तेज दिसू लागले आहेत. यामुळे उत्पादनात २० ते २५ टक्के घट येण्याची भीती व्यक्त होत आहे.
सततचा पाऊस, धुके यामुळे हळद पिकामध्ये काही पाने पिवळी पडली असून, निस्तेजपणा दिसत आहे. हळद उपटून पाहिली असता हळदीचा गड्डा तयार होण्यापूर्वीच पोचट दिसत आहे. यामुळे यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता दिसत आहे. – नंदकुमार मोरे, मिरज.
हेही वाचा : अहमदनगर : ईडीची कारवाई, ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीच्या कार्यालयांवर छापे, १ हजार कोटी रुपये गोठवले
अतिपावसाने हळद आणि आले पिकात कंदकुजचा रोग दिसणे ही सामान्य प्रक्रिया आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्याचा निचरा करून रोगाला अटकाव करता येतो. याचबरोबर या रोगाचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी. – मनोज वेताळ, कृषी अधिकारी.