सांगली : कोचिंग क्लासचे फॅड असलेल्या युगात दहा एकर डाळिंब शेती करत सव्वा कोटीचे उत्पन्न घेणाऱ्या प्रणवने शाळेचे तोंडही न पाहता ४८.२० टक्के गुण मिळवून यशाचे शिखर गाठले. शेतीत प्रचंड मेहनत घेणाऱ्या पोराच्या यशाने अख्खी खानजोडवाडी (ता.आटपाडी) हरकली असून गावात डिजे लावून गावच्या शेतकऱ्याच्या पोराचं कौतुक करण्यात आले.
प्रणव शंकर सूर्यवंशी या मुलाला दहावीमध्ये ४८.२० टक्के गुण मिळाले. त्याला कमी गुण मिळवून देखील गावाने त्याच्या अभिनंदनाचे फलक लावले आहेत. कारण प्रणवला पहिल्यापासून अभ्यासाचा कमी आणि डाळिंब शेतीचा जास्त नाद लागला होता. दहा एकरावरील डाळिंब शेती प्रणव एकटा सांभाळतो. मागील वर्षी या शेतातून १ कोटी २० लाखांचे उत्पन्न त्याने घेतले आहे. त्यामुळे अभ्यासात जेमतेम असलेला प्रणव दहावीत ४८.२० टक्क्यांवर का होईना पास झाला. पण, दहावीत असून देखील तो प्रगतशील बागायतदार आहे याचा आनंद गावकऱ्यांना आहे. त्यामुळे गावात प्रणवचे काठावर का पास होईना त्याच्या अभिनंदनाचे भले मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहे.
हेही वाचा : सोलापूर: वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षकाला विद्यार्थ्यानेच घातला १२.५० लाखांस गंडा
प्रणव शंकर सूर्यवंशी (वय १६ वर्ष) दहावी मध्ये शिकत होता. त्याला अभ्यासापेक्षा शेतीची प्रचंड आवड होती आणि या वयात देखील तो त्याच्या डाळिंब शेतीत सगळी कामे करत होता. खानजोडवाडी गाव हे डाळिंबाचे कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते. इथे घरटी डाळिंब शेती आहे. त्यामुळे प्रणवला डाळिंब शेतीचे प्रचंड वेड आहे. तो स्वतः १० एकरावरची डाळिंब बाग सांभाळतो आहे. डाळिंब शेतीत औषध मारण्यापासून ते सर्व कामे प्रणव या वयातच शिकला. दहावीमध्ये शाळेला असून त्याने शाळेकडे एवढे लक्ष दिले नाही पण डाळिंब शेतीत लक्ष दिले. प्रणवने शेतीमध्ये कष्ट करत दहावीची परीक्षा दिली. अभ्यासाकडे दुर्लक्ष करत, कधी कधी शाळेत जाणारा प्रणव दहावी पास झाला. त्याच्या या यशाचा सर्व गावाला आनंद झाला . त्यामुळे सर्व गावांनी मिळून त्याचे पोस्टर लावले, त्याचा आदर सत्कार केला.