सांगली : राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काळी गुढी उभारून निषेध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. त्यांच्या जाहीरनाम्यात ही तशी घोषणा केली होती. त्यामुळेच इच्छा नसतानाही राज्यातील शेतकऱ्यांनी भरभरून मते दिली. मात्र सत्तेवर आल्यावर कर्जमाफीची घोषणाच विसरून गेले. नुकत्याच झालेल्या उन्हाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीरच करून टाकले शेतकऱ्यांची कर्ज माफी शक्य नाही. सर्वांनी कर्जे भरावीत म्हणजेच ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे.

तसेच महिलांनाही २१०० रुपये देणार म्हणून घोषित केले, आता १५०० रुपये ही काढून घेण्याची भाषा सुरु आहे.या फसव्या सरकारच्या निषेधार्थ काळी गुढी उभारून निषेध केला. त्यांच्या नावाने निषेधाच्या घोषणा दिल्या. यापुढे कर्जमाफी साठी रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा त्यांनी दिला यावेळी श्री. खराडे यांच्यासह भरत चौगुले, प्रकाश मिरजकर, अजित हळींगळे, तानाजी चव्हाण, संजय बेले, संदीप राजोबा, सर्जेराव पवार, बाबासो संदे, आप्पासाहेब पाटील, बाबासाहेब पाचोरे, शशांक पाटील, विजयकुमार पाटील ,सुरेश पाचिबारे आदिसह शेतकरी उपस्थित होते.