सांगली : निर्यातक्षम केळी उत्पादन करून अधिक उत्पन्न मिळवता येईल. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी भिलवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या केळी पीक परिसंवादात केले. काकासाहेब चितळे फौंडेशन आणि भिलवडी ग्रेप ग्रोअर सोसायटीच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
भिलवडी, अंकलखोप, वसगडे परिसरात केळी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. केळी पिकात शेतकऱ्यांना असलेल्या मोठ्या संधीचा लाभ व्हावा यासाठी पाणी, खत, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि विक्री व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती व्हावी याकरिता माळवाडी येथील बाबासाहेब चितळे मेमोरियल ट्रस्टमध्ये केळी पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. भिलवडीसह माळवाडी, अंकलखोप, वसगडे, ब्रह्मनाळ, खटाव, खंडोबाचीवाडी, धनगाव परिसरातील २०० हून अधिक शेतकरी या परिसंवादात सहभागी झाले होते. महिला शेकऱ्यांची उपस्थिती ही लक्षणीय होती. काकासाहेब चितळे फौंडेशनचे गिरीश चितळे आणि मकरंद चितळे यांनी यासाठी पुढाकार घेतला.
केळी विशेषज्ञ तुषार जाधव यांनी शेतकऱ्यांना जमिनीची प्रत, रोपांची निवड, लावणीनंतर रोपांची निगा, पाणी, खत व्यवस्थापन, रोग कीड व्यवस्थापन, निर्यातक्षम केळी उत्पादनासंदर्भात तसेच केळी पिकातील खोडवा व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
बना हेल्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी इंदापूरचे अध्यक्ष जे. के. शिंदे यांनी केळी पिकातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असलेल्या संधीबाबत माहिती दिली. तर निर्यात सल्लागार दिलीप घोरपडे यांनी परदेशात केळी पिकाला असलेल्या मागणीबाबत माहिती दिली. तर आबासाहेब काळे यांनी केळी पिकासंदर्भात असलेल्या जागतिक पातळीवरचे भारताचे योगदान शासकीय पातळीवरून होणारी मदत वेगवेगळ्या निर्यातदार कंपन्या आणि सल्लागार यांचे चालणारे कार्य याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. जिल्हा कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती होण्यासाठी अशा उपक्रमाची शेतकऱ्यांसाठी गरज असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा मकरंद चितळे, पुष्कर चितळे, रघुनाथ देसाई, व्यंकोजी जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अतुल चितळे, अशोक मगदूम, भारतीताई दिगडे, महावीर चौगुले, शशिकांत कुलकर्णी, दत्ता उतळे आदी उपस्थित होते. सुबोध वाळवेकर यांनी आभार मानले.