सांगली : पावसाची उघडीप असली तरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील वारणा, कृष्णाकाठ अद्याप धास्तावलेला आहे. सांगली, मिरज शहरात कृष्णा नदीने शनिवारी इशारा पातळी गाठली असून मदत व बचाव कार्यासाठी सैन्य दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
शुक्रवारपासून पावसाचा जोर मंदावला असला तरी अधूनमधून पावसाची सर येतच आहे. ओढे, नाल्यांना पाझर सुरू झाल्याने हे पाणी नदीपात्रात मिसळून पाणी वाढत असताना धरणातील पाणी पातळी मर्यादित ठेवण्यासाठी चांदोलीतून १६ हजार ३८५ आणि कोयनेतून ४२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. यामुळे पावसाचा जोर नसला तरी नदीतील पाणी पातळी वाढत आहे. शनिवारी सांगलीमध्ये तर शुक्रवारी मिरजेत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली. सांगलीत आयर्विन पूलाजवळ असलेली इशारा पातळी ओलांडून कृष्णा नदीची पाणी पातळी ४० फूट ४ इंच झाली असून मिरजेतील कृष्णा घाट येथे ५२ फूट ५ इंच झाली आहे. सांगलीत ४५ फूट तर मिरजेत ५७ फूट धोका पातळी आहे.
गेल्या दोन दिवसात नदीत पाणी पातळी वाढल्याने पूरबाधित क्षेत्रातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सांगली शहरातील सुर्यवंशी प्लॉट, आरवाडे पार्क, पटवर्धन पार्क, गोवर्धन प्लाट, साईनाथ नगर, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड, जगदंब कॉलनी, पंत लाईन आदी उपनगरासह मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुययातील ४ हजार १२१ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
पूरकाळात मदत व बचाव कार्यासाठी महापालिकेचे अग्निशमन दल, एनडीआरएफची एक तुकडी कार्यरत असतानाच शुक्रवारी संध्याकाळी सैन्य दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. या तुकडीत १० अधिकारी व ९०जवानांचा समावेश आहे. सैन्य दलाच्या जवानांनी शनिवारी कर्नाळ रोड, कृष्णाघाट येथे पूरस्थितीचा आढावा घेत सरावही केला.
हेही वाचा : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेला वित्त विभागाचाच विरोध असल्याची चर्चा; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…
शनिवारी खा. विशाल पाटील, माजी राज्यमंत्री आ.डॉ. विश्वजित कदम यांनी पूरबाधित क्षेत्राची पाहणी करत पूरग्रस्तांशी संवाद साधला. तसेच सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी करून आपत्तकालीन कक्षास भेट देउन मदत व बचाव कार्याची माहिती घेतली. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पूरबाधितांना स्थलांतर करण्यास वाहने उपलब्ध करून दिली आहेत, तर मदन पाटील युवा मंचच्यावतीने जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात ११.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाउस शिराळा तालुक्यात ४८.१ मिलीमीटर झाला. चांदोली धरणात ८७.९१ टक्के तर कोयना धरण ७९ टक्के भरले आहे. सांगली, कोल्हापूरची पूरहानी टाळण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे.