सांगली : लहान मुलांना खेळण्यासाठी खोपटापुढे डांबून ठेवलेल्या कोल्ह्याची एका अज्ञात महिलेच्या जागरुकतेने मुक्तता झाली. वन विभागाने कोल्ह्याला ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गोटखिंडी गावातून शुक्रवारी एका महिलेने ऊस तोडणी कामगारांच्या वस्तीवर काही लोकांनी एक कोल्हा (Indian Jackal) बांधून ठेवला असल्याची माहिती प्राणीमित्र कौस्तुभ पोळ यांना फोनवरुन दिली.
हेही वाचा : “लाठीमार होताच मनोज जरांगे घरात जाऊन झोपले”; भुजबळांच्या टीकेला रोहित पवारांचं उत्तर, म्हणाले…
ते लोक कोल्ह्याशी खेळ करणे, त्याला दोरीने फरफटत नेणे असे कृत्य करीत होते. त्याचे खूप हाल करत होते. पोळ यांनी तात्काळ ही माहिती सांगलीचे सहाय्यक उप वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांना दिली. त्यांनीही लगेच इस्लामपूर वनविभागाला घटनेची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार इस्लामपूर वनविभागाचे वनरक्षक श्री. कोळेकर यांनी गोटखिंडी गावात वस्तीवर जाऊन कोल्हा जप्त केला. आता त्याची वैद्यकीय तपासणी करून लवकरच त्याला निसर्गात मुक्त केले जाईल असे कोळेकर यांनी सांगितले.