सांगली : विटा नगरीचे वैभव असलेला गणेश हत्ती शुक्रवारी वैद्यकीय उपचारासाठी गुजरातमधील जामनगर येथील हत्ती रूग्णालयाकडे खास रूग्णवाहिकेतून रवाना करण्यात आला. हत्तीला मणययाचा विकार असून पायालाही जखमा झाल्या आहेत. तज्ञाकडून योग्य उपचार करून गणेश हत्ती पुन्हा रूबाबात विटा शहरात फेरफटका मारताना नागरिकांना दिसावा, यासाठी त्याच्यावर चांगले वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्याला जामनगरला पाठविण्याचा निर्णय यात्रा समितीने घेतला, असे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी सांगितले.
भैरवनाथ यात्रा समितीचे तत्कालिन अध्यक्ष स्व. हणमंतराव पाटील यांनी यात्रा समितीसाठी मोहन नावाचा हत्ती आणला होता. वीस वर्षाच्या वास्तव्यानंतर २००० साली त्याचा मेंदूज्वराने मृत्यू झाला. त्यानंतर सात वर्षांनी यात्रा समितीने बिहारमधील पाटणाजवळील सोनपूर येथून गणेश या हत्तीला विट्यात आणले. त्यावेळी गणेशचे वय चार वर्षे होते. मात्र गेल्या चार महिन्यांपासून गणेशला मणययाचा विकार झाला होता. त्याच्या पायाला जखमाही होत आहेत. पशूवैद्यकीय अधिकारी व कर्नाटकातील तज्ञांनीही त्याच्यावर उपचार केले.
हेही वाचा : महाड एमआयडीसीत स्फोट, पाच जण जखमी; ११ कामगार बेपत्ता
मात्र, आजार बळावतच चालला असल्याने त्याला अधिक चांगल्या उपचारांसाठी जामनगर येथील राधाकृष्ण टेम्पल येथील हत्ती उपचार केंद्रात पाठविण्यात आले. गणेशला पाठविण्यासाठी वन विभागाकडून प्रवास परवाना रितसर घेण्यात आला असून त्याला खास रूग्णवाहिकेतून गुजरातसाठी आज रवाना करण्यात आले. या वाहनात हत्तीला लागणार्या चार्यासोबतच २४ तास पाण्याची सुविधा आणि जामनगरमधील सात पशू वैद्यकीय तज्ञ, सात माहूत सोबत आहेत. गणेशला निरोप देत असताना महिलांनी त्याचे औक्षण करीत लवकरात लवकर बरा होऊन विट्याला परतावा अशी भावना व्यक्त केली.