सांगली : किलोला ६०० रुपयांवर गेलेल्या लसणाचा दर आता २०० रुपयांपर्यंत खाली आल्याने स्वयंपाकघरात पुन्हा लसणाचा ठसका येऊ लागला आहे. लसणाच्या दरात घसरण झाली असली तरी, कांद्याचे दर अद्याप चाळीशीच्या घरातच आहेत. सांगलीच्या ठोक बाजारात लसणाचा क्विंटलचा दर २५ ते ४५ हजारांपर्यंत पोहोचला होता. मात्र, गेल्या १० दिवसांपासून दर उतरू लागले असून, ते १० ते २२ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
हेही वाचा : Devendra Fadnavis: ९८ गुंतवणूक विदेशी, दावोसमधील करारांबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा
सांगली बाजारात गुजरात व मध्य प्रदेशमधून दररोज १०० क्विंटल लसणाची आवक होत आहे. आठवडे बाजार व भाजी मंडईमध्ये २०० रुपयांपर्यंत दर आले असून, पन्नास रुपये पाव किलो दराने किरकोळ विक्रेते लसणाची बाजारात विक्री करत आहेत. कांद्याची आवक वाढल्यानंतरही कांद्याचे दर मात्र अद्याप चढेच आहेत. हा दर प्रतवारीनुसार किलोला ३० ते ५० रुपये आहे. बाजार समितीच्या ठोक बाजारात बुधवारी ४ हजार ७५७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर किमान दर एक हजार ते साडेतीन हजार रुपये होता, अशी माहिती बाजार समितीतून देण्यात आली.