सांगली : जिल्ह्यातील पाण्यापासून वंचित असलेल्या ५३ गावांसाठी सुधारित टेंभू योजनेला राज्य शासनाने मंजूरी दिली असून यासाठी आठ टीएमसी पाणीही आरक्षित करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली. यामुळे १ लाख २१ हजार ४७५ हेक्टर क्षेत्राला शाश्वत पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
खा. पाटील म्हणाले, विस्तारित टेंभू योजनेला ७ हजार ३७० कोटी खर्च येणार असून आतापर्यंत ३ हजार ४०० कोटी रूपये खर्च झाले आहेत. विस्तारित टेंभू योजनेत टप्पा अ व ब, टेंभू टप्पा ५ ची वितरण व्यवस्था, पळशी उपसा योजना यांची कामे होणार आहेत .त्याचबरोबर विस्तार टेंभू योजनेत कवठेमंहाकाळ बेवनुर व आटपाडी कामथ तलाव गुरुत्वनलिका यांचा समावेश करण्यात आहे. या योजनेतून खानापूर मधील १५, आटपाडी १३, तासगाव १३, कवठेमहांकाळ ८ आणि जत ४ अशा ५३ वंचित गावांना पाणी मिळणार आहे.
हेही वाचा : सांगली : माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन
विस्तारित योजनेसाठी आठ टीएमसी पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून यापैकी सातारा जिल्ह्यातील माण-खटावसाठी २.५, सांगलीसाठी ४.५ आणि सांगोलासाठी एक टीएमसी पाणी असल्याने सध्या सुरू असलेल्या योजनांवर पाण्यासाठी अतिरिक्त भार पडणार नाही असेही खा. पाटील यांनी सांगितले.