सांगली : विट्यातील शासकीय निवासी शाळेतील २३ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली असून सोमवारी सकाळी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आ. सुहास बाबर यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
समाज कल्याण विभागाच्यावतीने विट्यात निवासी शाळा चालवली जात आहे. या निवासी शाळेतील ४९ विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे आहार देण्यात आला. रविवारी रात्री आहारात मटणाचे जेवण देण्यात आले होते. यानंतर आज सकाळपासून काही मुलांना उलटी, मळमळ, जुलाबाचा त्रास सुरू झाला. एकाचवेळी २३ मुलांना त्रास सुरू झाल्यामुळे शाळा प्रशासनाने तातडीने मुलांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोटदुखी, उलटीचा त्रास होऊ लागल्याने शासकीय निवासी शाळेतील मुलांना घेऊन उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते. त्यानंतर डॉक्टराना शंका आल्याने मुलांकडून चौकशी केली असता रात्री खालेल्या जेवणातील मटणातून विषबाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असून २३ मुलांवर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विषबाधा झालेले विद्यार्थी असे- सुरज प्रकाश जाधव (वय १६), श्रवणकुमार विठ्ठल बागडे (वय १७), सुरज किसन साठे (वय १५), आदित्य आनंदा रोकडे (वय १६), निर्मल किशोर सावंत (वय १४), स्मित सुभाष झिमरे (वय १२), योगेश बिरुदेव मोटे (वय १३), शुभम प्रकाश माळवे (वय १४), हर्षवर्धन सुनील गायकवाड (वय १३), तेजस सचिन काटे (वय १५), आदित्य कैलास लोखंडे (वय १६), आरूष संजय सकट (वय १२), यश विजय सकट (वय १२), श्रीवर्धन प्रवीण माने (वय ११), प्रज्वल शशिकांत शिंदे (वय १६), सिद्धार्थ जित्ताप्पा बनसोडे (वय १३), आयुष नामदेव सावंत (वय १३), तन्मय प्रकाश निकाळजे (वय १४), सक्षम दिनकर सुखदेव (वय १४), संदीप सुदर्शन नातपुते (वय १४), प्रणव सूर्यकांत उबाळे (वय १६), अभिषेक गौतम डोळसे (वय १२), चैतन्य शशिकांत शिंदे (वय १२).
हेही वाचा : रत्नागिरी : कोंबड्याची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या अडकला खुराड्यात
दरम्यान, विषबाधेची माहिती मिळताच आ. बाबर यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच शाळेत जाऊनही पाहणी केली. काल रात्री मांसाहर जेवण झाल्यानंतर आज सकाळी मुलांना दूध देण्यात आले. यामुळे विरोधी अन्नामुळे हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच निवासी शाळेतील जलशुध्दीकरण यंत्रणाही बंद आहे. ती तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या प्रकाराची चौकशीही करण्यात येणार असल्याचे आ. बाबर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.