सांगली : जिल्ह्यातील सर्व प्रशासनिक विभागांनी सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखद होण्यासाठी प्रयत्न करावेत. सामान्य नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात. शासनाच्या १०० दिवस उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना जनमानसात शासन व शासकीय कार्यालयांची सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज येथे दिले.

राज्य शासनाच्या १०० दिवस कृती आराखड्याच्या सांगली जिल्ह्याच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पारदर्शक कामकाज, नागरिकांना सौहार्दाची वागणूक देत त्यांची प्रकरणे विहित मुदतीत निर्गत करावीत. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका शासकीय अधिकाऱ्यांची असावी, असे स्पष्ट करून विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ‘देश आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जबाबदारीने भूसंपादन करावे. जिल्हा, उपविभाग आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवावा. उद्योगपूरक वातावरण तयार करावे. केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना राबवताना येणाऱ्या अडचणींचे परस्पर समन्वयाने तातडीने निराकरण करावे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्हा प्रशासन व महसूल विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सादर केला. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच पोलीस विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा व कार्यवाहीची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादर केली. महानगरपालिकेकडून सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, ई ऑफिस व अन्य सोयी सुविधांची माहिती महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सादर केली.

Story img Loader