सांगली : दिवाळी तोंडावर आली असतानाही परतीच्या पावसाचा मुक्काम कायम असून, तासगावसह कवठेमहांकाळ, पलूस, खानापूर तालुक्यात रात्रभर पावसाने धिंगाणा घातल्याने द्राक्ष बागायतदारांचे तोंडचे पाणी पळाले आहे. रात्रभरच्या पावसाने छाटणी झालेल्या द्राक्षाच्या कोवळ्या फुटीत पाणी साचले असून, दावण्यासह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महागडी औषध फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत.
गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस आज पहाटेपर्यंत सुरूच होता. त्यात शुक्रवारी दिवसभर ढगाळ हवामानानंतर सायंकाळपासून पुन्हा खंडित स्वरूपात पाऊस पडत आहे. तासगाव, पलूस, खानापूर, कवठेमहांकाळ या तालुक्यांत द्राक्षाची फळछाटणीची कामे काही झाली आहेत, तर काही सुरू आहेत. अशात पाऊस पडल्याने छाटणी लांबणीवर टाकावी लागत आहे. तर ज्या बागांची छाटणी झाली आहे, त्या बागांतील कोवळे घड, फुटवे, फुलोऱ्यातील घड यांना या पावसाचा तडाखा बसला आहे. पावसाचे पाणी नवीन फुटव्यांत साचून राहिल्याने बुरशीजन्य रोग बळावले आहेत. या रोगापासून बचाव करण्यासाठी महागडी औषधफवारणी करूनही उपयोग होत नाही. कारण औषधफवारणी केली, की पावसाची सर आली, तर सगळेच औषध धुऊन जात असल्याने रोगाचा सामना कसा करायचा, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
हेही वाचा : सोलापुरात कांद्याची आवक वाढली; वाढीव सरासरी दरामध्ये घसरण
तासगाव, पलूस तालुक्यात रात्री उशिरा सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पडत होता. यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने ओल्या झालेल्या जमिनीत आणखी पाणी साचले, तर रानात ओल हटण्याचे नाव घेत नसल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सोयाबीनची काढणी करून रान रब्बीच्या पेरणीसाठी तयार असून, ओलच कमी होत नसल्याने पेरण्या करता येत नाहीत अशी स्थिती आहे.
हेही वाचा : स्वार्थातून तयार झालेल्या महाविकास आघाडीचा पराभव नक्की; मुख्यमंत्री
शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस (३९ मिमी) पलूस तालुक्यात झाला. तर तासगाव तालुक्यात ३२.७ मिमी पाऊस झाला. अन्य ठिकाणी झालेला पाऊस असा – मिरज ११, जत १०.४, खानापूर २१.५] वाळवा १८.१, शिराळा १२.७, आटपाडी ३.९, कवठेमहांकाळ २१.३ आणि कडेगाव २५.७ मिमी.