सांगली : गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसाने द्राक्ष पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून खराब झालेल्या द्राक्षाला मातीआड करून हिरवळीचे खत म्हणून वापर काही शेतकर्यांनी केला आहे. तयार झालेल्या द्राक्षाचे अवकाळीने मणी तडकले असून याचा परिणाम म्हणून घडकुज सुरू झाल्याने खराब द्राक्षाचे काय करायचे हा प्रश्न शेतकर्यांनी हिरवळीचे खत म्हणून उपयोग करत निकाली काढला आहे.
बाजारात चांगला दर मिळतो म्हणून कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागातील शेतकरी बेमोसमी द्राक्षाची फळछाटणी करतात. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस फळछाटणी झालेल्या द्राक्ष बागातील माल काढणीला आलेला असताना गेल्या आठवड्यात अचानक हवामानात बदल होत अवकाळीने चार दिवस ठिय्या मारला. यामुळे तयार मालात पाणी साचले. द्राक्ष मण्यातील साखर आणि वरून पाणी यामुळे मणी तडकून घडातच कुजल्याने दुर्गंधी पसरली तर मालही खराब झाला. या मालाला व्यापारी पाहण्यासही येईना झाले. तसेच सततच्या दमट हवामानामुळे आणि पावसाने फुलोर्यातील द्राक्षाबरोबरच हरभर्याच्या आकाराचे मणी झालेल्या द्राक्ष घडावर दावण्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांना खराब मालाचे करायचे काय हा प्रश्न सतावत होता.
हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला, “मी इतका मोठा नाही की शरद पवारांना काही समजून पक्ष फोडेन, आणि..”
काही शेतकर्यांनी खराब द्राक्ष ओढ्याकाठाला, बांधावर टाकली. मात्र, कवठेमहांकाळ, बंडगरवाडी, शिंदेवाडी येथील काही शेतकर्यांनी नुकसानीत फायदा शोधण्याचा प्रयत्न केला. खराब द्राक्षे दोन वेलीमधील चरीमध्ये टाकून ट्रॅक्टर व खोर्याच्या मदतीने मातीआड केली. लाखो रूपयांची द्राक्षे मातीआड करताना शेतकरी अस्वस्थ झाला आहे.