सांगली : पालकमंत्री सुरेश खाडे यांचे स्वीय सहायक तथा विद्यमान मिरज विधानसभा प्रमुख प्रा. मोहन वनखंडे यांची पदोन्नतीवर प्रदेश पातळीवर नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री खाडे आणि प्रा. वनखंडे यांच्यात सुरू असलेल्या सुप्त राजकीय संघर्षातून ही नियुक्ती असल्याचे मानले जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारात अधिक गती यावी, कार्यकर्त्यांना कार्यप्रवण करण्यासाठी लोकसभा मतदार संघ आणि विधानसभा मतदार संघासाठी प्रमुख नियुक्त करण्यात आले होते. यापुर्वी खानापूर-आटपाडीचे विधानसभा प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची पदावरून गच्छंती करण्यात आली होती. यानंतर मिरज मतदारसंघात याचीच पुर्नरावृत्ती झाल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा : राज्य सरकारचा गुगलबरोबर करार, विविध क्षेत्रात AIचा वापर वाढणार, मग रोजगार घटणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
प्रा. वनखंडे यांना पक्षाने पदोन्नती देत त्यांच्याजागी पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब धामणे यांची नियुक्ती केली आहे. प्रा. वनखंडे यांना विधानसभा क्षेत्र प्रमुख पदावरून प्रदेश पातळीवरील अनुसूचित जाती जमातीचे महामंत्री म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तर रिक्त झालेल्या मिरज विधानसभा प्रमुखपदी मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब धामणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अदलाबदलीने खुद्द पालकमंत्री खाडे यांच्या मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे.