सांगली : आठवड्यापासून तीव्र उष्म्याने हैराण झालेल्या जिल्ह्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या वळिवने काही ठिकाणी दमदार हजेरी लावली तर बहुसंख्य ठिकाणी हुलकावणी दिली. मिरज, विटा परिसरात जोरदार झालेल्या पावसाने सांगली, तासगावला हुलकावणी दिली. जत, आटपाडीमध्ये अद्याप पावसाची प्रतिक्षाच आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे झाड पडून दोन घरांचे नुकसान झाले तर, शनिवारी मिरजेत वॉन्लेस हॉस्पिटलजवळ वाऱ्याने झाड पडल्याने दोन रिक्षांचे नुकसान झाले.
आज दुपारी तासगावच्या पूर्व भागातील सावळज, सिध्देवाडी परिसरात काळे ढग जमले. मात्र वाऱ्याने पाऊस मिरज व विटा परिसराकडे सरकला. मिरजेत अर्धा तास दमदार पाऊस झाला. सखल भागात पाणी साचून रस्तेही जलमय झाले होते. वीजेचा कडकडाट आणि वारे यामुळे वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता.
हेही वाचा : “पक्ष कमजोर झाला की शरद पवार काँग्रेसमध्ये जातात आणि…”, देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत, म्हणाले…
जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वैभव बाळासो दाइंगडे व दत्तात्रय शहाजी पाटील यांच्या वारणा शिक्षण संस्थेच्या शेजारी असणाऱ्या घरावर आज झालेल्या व अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट पाऊसामुळे झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे. ऐतवडे खुर्द सह कुंडलवाडी, चिकुर्डे, देवर्डे आदी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसाने झोडपून काढले. ऐतवडे खुर्द येथील रस्त्या लगत असणारे अनेक शेत वस्तीवरील पत्र्याचे छप्पर उडून गेले. मिरजेत जोरदार वाऱ्यांने झाडाच्या फांद्या मोडून पडल्या. फांद्या उभ्या असलेल्या रिक्षावर पडल्याने दोन रिक्षांचे नुकसान झाले.