सांगली : मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळंच गमवाल एवढंच सांगतो असे प्रतिआव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी समाज माध्यमावरील संदेशातून आमदार डॉ. विश्‍वजित कदम व खासदार विशाल पाटील यांना अप्रत्यक्ष दिले. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. शनिवारी रात्री आमदार कदम व खा. पाटील यांनी कसबे डिग्रजमध्ये झालेल्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये इस्लामपूर-वाळवा मतदार संघात यापुढे दसपटीने लक्ष घातले जाईल असा इशारा दिला होता. याचे पडसाद आता समाज माध्यमावर दिसू लागले आहेत.

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीसांचा चेहरा दाखवून…”, सुषमा अंधारेंचा गंभीर दावा; म्हणाल्या, “त्यांची वाढती नकारात्मक छबी…”

मिरज तालुक्यातील काही गावांचा समावेश इस्लामपूर विधानसभा मतदार संघामध्ये समावेश असल्याने काँग्रेस नेत्यांनी या मतदार संघात जाऊन दिलेला इशारा आमदार जयंत पाटील समर्थकांनी चांगलाच मनावर घेतला असून या इशार्‍याला प्रतिआव्हान सोमवारी समाज माध्यमातून देण्यात आले. समाज माध्यमातून आमदार पाटील यांच्या आवाजात ध्वनी फित प्रसारित करण्यात आली आहे. या ध्वनीचित्रफितीमध्ये म्हटले आहे, जयंत पाटील गोड बोलतात, पण जयंत पाटलांचा विरोध अजून तुम्ही बघितलेला नाही. मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळच गमवाल, एवढंच सांगतो असा संदेश देण्यात आला आहे. यामुळे वाळव्यासह सांगली मतदार संघात यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

Story img Loader