सांगली : कडेगाव तालुक्यातील शाळगाव-बोंबाळेवाडी औद्योगिक वसाहतीतील एका रसायन कारखान्यात विषारी वायूची गळती झाल्याने दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. या गळतीमुळे याशिवाय अन्य दहा जण बाधित झाले असून यातील तीन रुग्ण अत्यवस्थ आहेत. या गळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीस खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील नागरिकांना अन्यत्र हलवण्यात आले. नंतर परिणाम ओसरल्यावर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली.

औद्योगिक वसाहतीमध्ये म्यानमार रसायन कारखाना असून, या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विषारी वायूची गळती झाली. त्यामध्ये राणी राजेंद्र उथळे (वय ४०, रा. येतगाव) या महिलेचे उपचार सुरू असताना रात्री, तर नीलम रेठरेकर (वय ४५, रा. वांगरेठरे मसूर) आणि किशोर चापकर (वय ४५, रा. बोंबाळेवाडी) या दोघांचा उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाला.

हेही वाचा : Marathwada Assembly Election Results 2024 Live Updates: मराठवाड्यात मविआ पुन्हा वर्चस्व मिळविणार? महायुतीला लोकसभेची हाराकिरी भरून काढता येईल?

विषारी वायूची बाधा झालेल्या माधुरी पुजारी (वय ४०), सायली पुजारी (वय २२), मारुती थोरात (सर्वजण रा. बोंबाळेवाडी), प्राजक्ता पोपट मुळीक, वरद पोपट मुळीक, शिवानी राहुल मुळीक, शुभम अर्जुन यादव (सर्व रा. शाळगाव) यांच्यावर कराडमधील सह्याद्री, श्री हॉस्पिटलसह अन्य खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर रायगाव, शाळगाव व बोंबाळवाडी या परिसरातील १० जणांवरही स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.

विषारी वायुगळतीने परिसरातील डोंबा वस्ती, बारूखोल परिसरासह शाळगाव, बोंबाळेवाडी, रायगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले. सुरुवातीस खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील नागरिकांना अन्यत्र हलवण्यात आले. नंतर परिणाम ओसरल्यावर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली.

हेही वाचा : Mumbai Konkan Assembly Election Results 2024 Live Updates : मुंबईसह कोकणच्या जनतेचा कौल कोणाला? खऱ्या शिवसेनेचा फैसला होणार?

घटना घडल्यानंतर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तहसीलदार अजित शेलार, पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले. अग्निशामक यंत्रणा, वैद्यकीय पथकही परिसरात ठाण मांडून आहे. वायुगळतीच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात येत असून, या परिसरात रहिवासी मुखपट्टीचा वापर करून दैनंदिन काम करत आहेत.