लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : पावसाचा जोर कमी झाला असला तरी सांगलीत कृष्णेची पाणीपातळी इशारा पातळीजवळ तर मिरजेत इशारा पातळीच्यावर पोहचली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराच्या १० अधिकाऱ्यांसह शंभर जवान दाखल झाले आहेत. काल कोयनेतून ३२ हजार १०० क्युसेकचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ अपेक्षित आहे.

शनिवारी सकाळी आयर्विन पूल, सांगली येथील पाणी पातळी ३९ फुट ९ इंच असून इशारा पातळी ४० फूट व धोका पातळी ४५ फूट आहे तर, कृष्णाघाट, मिरज येथील पाणी पातळी ५१ फुट ९ इंच पातळी असून येथील इशारा पातळी ४५ फूट व धोका पातळी 57 फूट आहे. आमणापूर येथील कृष्णेवरील पूल पाण्याखाली गेला आहे.

आणखी वाचा-दरड – पुराचा धोका लक्षात घेता सातारा जिल्ह्यात ७०० लोकांचे स्थलांतर

सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, आरवाडे प्लॉट, पटवर्धन पार्क, गोवर्धन प्लॉट,साईनाथ नगर, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळा रोड, जगदंब कॉलनी,पंत लाईन आदीसह पलूस, मिरज, वाळवा, शिराळा तालुक्यातील पूरबाधित क्षेत्रातील ४१२१ नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

कोयना धरणाच्या वक्र दरवाज्यातून १० हजार क्युसेक विसर्ग वाढवण्यात येत आहे यामुळे पाणी पातळीत वाढ होणार असून नदीकाठी सतर्क राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून शनिवारी सकाळी देण्यात आला आहे.