सांगली : वन कर्मचार्यांनी केलेल्या उपाय योजनेमुळे उसाच्या फडात आढळलेल्या बिबट्याची दोन पिले सोमवारी पहाटे पुन्हा मातेच्या कुशीत विसावली. बहे-नेर्ले हद्दीतील लक्ष्मी मंदिर परिसरात गडाळे यांच्या शेतात रविवारी दुपारी बिबट्याची दोन पिले आढळली होती. याबाबत तत्काळ आधार अॅनिमल रिस्पेक्ट समूहाचे प्रा.विजय लोहार यांच्यासह वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाच्या उपवन संरक्षक डॉ. नीता कट्टे, सहायक वन संरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्य जीवरक्षक अजित पाटील आणि वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी आदींच्या नेतृत्वाखाली मोहिम राबविण्यात आली.
हेही वाचा : बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मित्राचा खून, दोघांना अटक
घटनास्थळी उसतोड सुरू असताना बिबट्याची पिले आढळली होती. त्या ठिकाणी उसतोड थांबविण्यात आली. पिलांना संरक्षित करून त्या ठिकाणी बछड्यांना घेण्यासाठी मादी बिबट येणार हे गृहित धरून दृष्य छायांकित करण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले. आज पहाटे तीन वाजणेच्या सुमारास मादी बिबट्याने घटनास्थळी येऊन दोन्ही पिलांना घेऊन जात असल्याची चित्रफित मुद्रित झाली.