सांगली : अनैतिक संबंधास नकार देणार्‍या महिलेचा खून केल्या प्रकरणी आरोपी पांडूरंग कामू लोखंडे (वय ३३, रा. खिलारवाडी, ता. जत) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.के. शर्मा यांनी बुधवारी जन्मठेप आणि २ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीचे एका महिलेशी सात ते आठ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. ही बाब कुटुंबातील अन्य लोकांना माहिती झाल्यानंतर महिलेने आरोपीशी असलेले अनैतिक संबंध तोडले. यामुळे आरोपी लोखंडे हा चिडून होता. यातूनच मृत महिलेला तिच्या घरातून स्वत:च्या घरी घेउन गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : आर्थिक लाभासाठी २५ लाखांस जिवंत शंख खरेदी करणे पडले महागात, महाराजासह पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल

घरी गेल्यानंतर दाराला कडी घालून महिलेवर धारदार हत्याराने वार करून तिचा खून केला. ही घटना ३० डिसेंबर २०१८ रोजी घडली होती. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करून पोलीसांनी आरोपपत्र सत्र न्यायालयात सादर केले होते. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने १६ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपीला खून प्रकरणी दोषी ठरवून आज त्याला जन्मठेप आणि दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकार पक्षाची बाजू श्रीमती जे. के. लक्का यांनी मांडली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli life imprisonment to a person who killed a woman who refused to have immoral relationship with him css