सांगली : सांगली बाजारात नवीन हंगामात प्रारंभाला प्रतिकिलो हिरव्या बेदाण्याला २२५ रुपये, तर पिवळ्या बेदाण्याला १९१ रुपये दर मिळाला. नवीन हंगामातील बेदाणा सौद्याला बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. सांगली बाजार समितीमध्ये शुक्रवारी झालेल्या नवीन बेदाणा सौदा शुभारंभ प्रसंगी सात दुकानांत ३० टन नवीन बेदाण्याची आवक झाली होती. त्या वेळी यादव ट्रेडर्स यांच्या दुकानात खंडेराजुरीचे शेतकरी प्रमोद अशोक चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास २२५ रुपये प्रतिकिलो नमो ॲग्रोटेक यांनी दर दिला. तसेच अक्षित सेल्स कार्पोरेशन या दुकानात नितीन चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास २२१ रुपये दर शिवानंद ॲग्रोटेक यांनी दिला.
हजारे सेल्स कार्पोरेशन या दुकानात अनंत चौगुले, खंडेराजुरी यांचा पिवळा बेदाणा १९१ प्रतिकिलो दराने राजयोग एंटरप्राइजेस यांनी खरेदी केला. त्या वेळेस मुर्गेंद्र ॲग्रोटेक, व्यंकटेश ट्रेडर्स, सहारा ट्रेडर्स, अक्षित सेल्स कार्पोरेशन, यादव ट्रेडर्स, सहारा ट्रेडर्स, हजारे सेल्स कार्पोरेशन या दुकानांत नवीन आवक शुभारंभ झाला. त्या वेळी सरासरी हिरव्या नवीन बेदाण्यास १८० ते २२५ रुपये, मध्यम बेदाण्यास १३० ते १७० रुपये, काळ्या बेदाण्यास ६० ते १०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. पिवळ्या बेदाण्यास १८० ते १९१ रुपये भाव मिळाला.
त्या वेळी सभापती सुजय शिंदे म्हणाले, ‘द्राक्षाची फळछाटणी विलंबाने झाली असून, द्राक्ष लागणही कमी आहे. उपलब्ध माल बेदाणा उत्पादकाकडे पाठविण्याऐवजी शेतकरी थेट बाजारपेठेत पाठवत असल्याने बेदाणा उत्पादन या वेळी कमी होण्याची चिन्हे आहेत. द्राक्षाला बाजारात दर चांगला मिळत असल्याने शेतकरीही थेट माल पाठवत आहेत. यामुळे बेदाण्याला यंदा चांगला दर मिळण्याची चिन्हे आहेत. दोनशे रुपये प्रतिकिलो सरासरी दर राहील, अशी शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सांगली बाजार समितीत बेदाणा विक्रीसाठी आणावा.
या शुभारंभ प्रसंगी संचालक आनंद नलवडे, शशिकांत नागे, पप्पू मजलेकर, काडाप्पा वारद, सचिव महेश चव्हाण, ज्येष्ठ व्यापारी अशोक बाफना, बेदाणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार, सतीश पटेल, कांती पटेल, सुशील हडदरे, शेखर ठक्कर, पप्पू ठक्कर, नितीन मर्दा, मुकेश केसरी, हिरेन पटेल, पवन चौगुले, रितेश मजेठिया, विनोद कबाडे, अभिजित पाटील, रवी पाटील आदी व्यापाऱ्यांसह बेदाणाउत्पादक उपस्थित होते.