सांगली : गायकाचे गाणे ऐन रंगात आले असतानाच तबल्यातून ताल सुटला, तर गायकाचे गाणे बेताल होते. हा बेतालपणा कायमचा दूर करण्यासाठी वाद्यनगरी असलेल्या मिरजेतील विजय व्हटकर या चर्मवाद्य कारागिराने वातावरणाचा कोणताही परिणाम टाळणाऱ्या आणि चामड्याचा वापर टाळत सिंथेटिक तबल्याची निर्मिती केली आहे. चर्मवाद्यातील या क्रांतिकारी यशाने तबल्यावरील कलाकारांचे ताक-धिना-धिनचे ताल हे आता अखंडित राहत संगीत सजवतील. व्हटकर यांनी या तबल्याचे स्वामित्व हक्कही मिळवले आहे.
संगीत सभेत गायक आपली कला सादर करत असताना तल्लीन झालेला असतो. अशा वेळी गायकाला साथ देणाऱ्या एखाद्या वाद्याचा स्वर बदलला, तर गायकाचा आणि रसिकांचाही रसभंग होतो. व्यासपीठावरील प्रकाश योजना आणि तबलजीची पडणारी बोटे यामुळे तबल्यावरील चामड्यामध्ये बदल होतो. या बदलामुळे तबल्याचा ध्वनी बऱ्याच वेळा कमी-जास्त होतो. तबला पुन्हा लावण्यासाठी तबल्याभोवती असलेल्या खुंट्या हातोड्याने कमी-जास्त करून चामड्याला कमी-अधिक ताण देऊन गमावलेला ध्वनी मिळवावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा गायकाची तल्लीनता खंडित होते. हे सारे टाळता येईल का, या हेतूने व्हटकर यांनी या सिंथेटिक तबल्याची निर्मिती केली आहे.
वादक, गायक यांच्या सूचनेला प्रतिसाद देत मिरजेतील चर्मवाद्यनिर्मिती करणाऱ्या श्री. व्हटकर यांनी तबल्यासाठी सिंथेटिकचा वापर करण्याचा प्रयत्न गेल्या अडीच वर्षांपासून सुरू केला. सुरुवातीस त्यावर शाई टिकत नसल्याचे त्यांना दिसून आले. यामुळे पुन्हा नवीन प्रयोग करत त्यांनी विविध प्रकारच्या रसायनांचा वापर करून शाई तयार केली. यात यश येत शाई निघण्याच्या धोक्यावरही त्यांनी मात केली. पारंपरिक चामड्याच्या तबल्यातून निघणारा ध्वनी किमान पाच ते नऊ आस (सेकंद) असतो. या नव्या तबल्यामध्ये हाच ध्वनी १७ आस मिळत आहे. एकदा तबला लावला, की तो पुन्हा लावावा लागत नाही. लावलेला ध्वनी कायम राहतो. त्यामुळे गायकाच्या गायनात व्यत्यय येत नाही. व्हटकर यांनी बनवलेल्या या नव्या पद्धतीच्या तबल्याला ख्यातकीर्त तबलजींकडूनही दाद मिळत आहे. या तबल्याचे स्वामित्व हक्कही व्हटकर यांनी मिळवले आहेत.
चर्मवाद्यामध्ये प्रामुख्याने खैराच्या लाकडावर जनावरांचे पाच मिलिमीटरचे चामडे वापरण्यात येते. परंतु पावसाळ्यात, हवेत दमटपणा वाढल्यास किंवा ती अतिथंड झाल्यावर तबल्याच्या आवाजावर परिणाम होतो. शिवाय बंदिस्त सभागृहात कला सादर करत असतानाही बऱ्याच वेळा व्यासपीठावरील वातावरणाचा परिणाम होऊन तबल्याच्या आवाजात चढ-उतार होत असे. तबल्याचा ठेका कमी-जास्त झाला, की कलाकाराच्या एकाग्रतेवर आणि त्याच्या कलेवर परिणाम होत होता. यावर मार्ग काढावा, अशी सूचना अनेक ज्येष्ठ कलाकारांनी वादकनिर्मिती करणाऱ्या कारागिरांना केली होती. यातूनच प्रेरणा घेत हा सिंथेटिक तबला बनवला आहे.
विजय व्हटकर, चर्मवाद्य निर्माते
हेही वाचा : Jitendra Awhad : “राज्यात १३ लाख अतिरिक्त मतदार”, जितेंद्र आव्हाडांनी गणितच मांडलं; निवडणूक आयोगालाही सवाल!
सुरेश तळवळकर यांच्याकडून दाद
तालयोगी पद्मश्री सुरेश तळवळकर यांनी नुकतीच व्हटकर यांच्या तबलानिर्मिती केंद्राला भेट देऊन सिंथेटिक तबल्याची चाचणी घेत नवनिर्मितीचे कौतुकही केले. त्यांनी दिवसभर केंद्रात थांबून ध्वनी कसा लागतो, किती काळ टिकतो याची चाचणी घेत काही तबले, पखवाज यांची खरेदीही केली. या वेळी त्यांच्यासमवेत राजप्रसाद धर्माधिकारी, शिष्य आशय कुलकर्णी, कृष्णा साळुंखे हेही उपस्थित होते.