सांगली : मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार विटा येथे समोर आला असून मृत व्यक्तीच्या वारसदाराकडून शासकीय देणे देण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना नगरपालिकेतील मिळकत व्यवस्थापकाला बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तक्रारदाराच्या वडिलांचे दोन महिन्यांपुर्वी नगरपालिका सेवेत कार्यरत असताना निधन झाले. त्यांच्या सेवा कालावधीतील शासकीय देय रकमेचा धनादेश देण्यासाठी मिळकत व्यवस्थापक पुंडलिक हिरामण चव्हाण यांनी वारसदाराकडे २५ हजारांची लाच मागितली होती.
हेही वाचा : “…तर युतीत फूट पडायला वेळ लागणार नाही”, शिंदे गटातील नेत्याचा भुजबळांना इशारा
याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आज विटा हायस्कूल येथे सापळा लावला असता चव्हाण यांनी २५ हजारांची लाच स्वीकारल्याचे आढळून आले. तात्काळ लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ त्याला अटक केली. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उप अधिक्षक संदीप पाटील, विनायक भिलारे, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, ऋषीकेश बडणीकर, सलिम मकानदार, अजित पाटील, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, सीमा माने, उमेश जाधव आदींच्या पथकाने केली.