सांगली : गुंठेवारी नियमानुकूल करण्यासाठी कडेगावच्या नायब तहसिलदारास ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने शुक्रवारी अटक केली. या घटनेने महसूल विभागात खळबळ माजली आहे. तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची अकृषीक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकुल आदेश देण्यासाठी कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार सुनिल जोतीराम चव्हाण, यांनी तक्रारदाराकडे ४५,००० रूपयांची लाच मागितली होती. विक्री केलेल्या जमिनीची गुंठेवारी नियमानुकुल आदेश देण्यासाठी ४५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा : छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर एकेरी भाषेत बोचरी टीका, म्हणाले, “तुझ्यासारखं मी सासऱ्याच्या घरी…”
मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय कडेगाव या ठिकाणी लाचलुचपत विभागाने सापळा लावला असता नायब तहसिलदार चव्हाण यांना ४० हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. चव्हाण यांचेविरुध्द कडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदरची कारवाई अधिक्षक अमोल तांबे, अप्पर अधिक्षक विजय चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक संदीप पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक, कर्मचारी ऋषीकेश बीकर, अनित पाटील, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, पोपट पाटील, धनंजय खाडे, अतुल मोरे, सिमा माने, चालक वंटमुरे यांनी केली.