सांगली : मराठा आंदोलक मनोज जरांगे सरकारच्या दारात येऊ लागताच सामाजिक सर्वेक्षणाचे सरकारने आदेश देणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत सांगितले. माध्यमांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, मराठा समाजाचे सर्वेक्षण आदेश यापुर्वीच सरकारने द्यायला हवे होते. जरांगेंनी वेळोवेळी मुदत दिली होती. मात्र, सरकारने याकडे प्राधान्याने पाहिले नाही. आता मात्र आंदोलक मुंबईच्या दारात येऊ लागताच सरकारने घाईगडबडीने आदेश दिले. इतके दिवस अन्य गोष्टींसाठी सरकारकडे वेळ होता, मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा प्राधान्याने हाताळला नाही. यातून सरकारचा नाकर्तेपणाच दिसून येतो. आताही लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा निर्णय देऊ नये, तर सरकारने समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यायला हवे. अन्यथा समाजावर फार मोठा अन्याय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : भाजपची आता राम यात्रा, महाराष्ट्रातून विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची तयारी
आमदार रोहित पवार यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस आली आहे. यानुसार या नोटीसीला उत्तर देण्यासाठी ते ईडी कार्यालयात जाणार आहेत. ही नोटीस जाणीवपूर्वक देण्यात आली अशी स्थिती आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने कोणालाही आंदोलन करण्याच्या अधिकृत सूचना दिलेल्या नाहीत. मात्र, कोणी उत्स्फुर्तपणे आंदोलन करत असतील तर त्यालाही विरोध नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.