सांगली : राम कोणत्याही एका पक्षाचा नाही, भाविकांचा राम हा आदर्श पुरूष आहे. राममंदिर उभे राहतेय याचा निश्चितच आनंद असून आपणही अयोध्येला जाणार आहे, मात्र, गर्दी कमी झाल्यानंतर जाईन असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी सांगितले. राजारामबापू कारखान्यावर श्रीराम मंदिरात अक्षता कलश पूजन झाल्यानंतर आमदार पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, राज्यात रामराज्य यावे ही जनतेची अपेक्षा आहे. राम मंदिर उभा राहतेय याचा निश्चितच आनंद आहे. मात्र, निमंत्रणावरून वाद व्हायला नको होता, कुणाला बोलवायचे हा न्यासाचा प्रश्न असला तरी सगळ्यांनीच मंदिर उभारणीसाठी देणगी दिली आहे. कोणा एका पक्षाने देणगी दिली आणि मंदिर उभारले असे नाही. रामनवमीच्या दिवशी राममूर्ती प्रतिष्ठापना झाली असती तर हा सोहळा आणखी रंगतदार झाला असता. तथापि, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मंदिराचे उद्घाटन होत असल्याचा आरोप होत आहे. याचा राजकीय फायदा कोणाला होईल असे वाटत नाही. अयोध्येतील मंदिर पाहण्याची इच्छा आहे. गर्दी कमी झाल्यानंतर निश्चितच अयोध्येला जाणार आहे.
हेही वाचा : “तुपकर स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवत असतील तर चांगलंच आहे, पण…”, राजू शेट्टीचं विधान
ते पुढे म्हणाले, मी मनाने कुठे आहे हे आमदार संजय शिरसाट सांगत असले तरी त्यांचे आणि माझे कधी बोलणेच झालेले नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वी मराठा आरक्षणाबाबत निर्णय जाहीर होईल असे वाटते. ते न्यायालयात टिकेल की नाही हे आताच सांगता येणार नाही. मात्र, हा प्रश्न सरकारला अडचणीचा ठरू शकतो.