सांगली : महापालिका आणि जिल्हा परिषदेत असलेल्या प्रशासकीय कारकीर्दीचा नूतन खासदार विशाल पाटील यांनी आढावा घेत असताना अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. विकास कामासाठी पुरेसा निधी आणूच पण प्रशासनाने कामे गतीने करतांना दर्जेदार होतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी आढावा बैठकीत दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेच्या वसंतदादा सभागृहामध्ये खा. पाटील यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीस आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. महापालिकेने राबविलेल्या घनकचरा प्रकल्पामध्ये महापालिकेला सहा कोटींचे नुकसान कसे झाले असा सवाल करून महिन्याला सात हजार टन कचरा संकलित होत असताना केवळ एक हजार टन खत निर्मिती होते मग बाकीचा कचरा कुठे जातो असा सवाल केला. एलईडी प्रकल्प राबविल्याने महापालिकेच्या वीज बिलात बचत होत असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगत असताना मग संबंधित समुद्रा कंपनीला दरवर्षी दरवाढ का द्यायची असा सवाल करून कराराचा कायदेशीर बाजूंने अभ्यास तुम्हीही करा मीही करतो असे सांगितले.

हेही वाचा : “मी डेफिनेटली खासदार होणार, आता बारामती…”, परभणीतील पराभवानंतर जानकरांनी सांगितली पुढची योजना

दरम्यान, जिल्हा परिषदेतही मुख्य कार्यकारी अधिकारी तृत्पी धोडमिसे यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून व सरकारकडून मिळालेल्या निधीतून ग्रामीण भागातील काही रस्ते पूर्ण झाले आहेत, तर काही रस्त्याची कामे प्रगतीपथावर असल्याचे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. झालेले काम उत्तम दर्जाचे झाल्याचे त्यांनी आवर्जुन सांगताच खा. पाटील यांनी चांगले ठेकेदार तुम्हाला कुठे मिळाले असा सवाल केला. यापुढे दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल, अधिकार्‍यांनी थातूर मातूर उत्तरे न देता वस्तुस्थिती कथन करावी अशा सूचना खा. पाटील यांनी यावेळी दिल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli newly elected congress mp vishal patil meeting with officers directs them about quality works css
Show comments