सांगली: मनोज जरांगे नावाचे भूत मानगुटीवर बसवून घेतले तर याची फारमोठी किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी रविवारी सांगलीत पत्रकार बैठकीत दिला. यावेळी त्यांच्यासमवेत ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक विष्णु माने आदी उपस्थित होते.
प्रा. हाके म्हणाले, सगेसोयर्यांना आरक्षण मिळाले नाही तर २८८ आमदार पाडण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. यातून त्यांचा राजकीय अजेंडाच दिसतो. कारण ज्यांना पाडायचा इशारा त्यांनी दिला ते सर्व यांचेच आमदार आहेत. जरांगेचा लढा हा गरजवंत मराठ्यांचा नसून तो आजपर्यंत जे सत्तेत आहेत, त्यांचाच आहे. कारण सगेसोयरे आणि सरसकट मराठा समाजासाठी ते आरक्षण मागत आहेत. सगेसोयरेची व्याख्याच घटनेत नाही. मग कसे ते आरक्षण मागतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी शेंडगे यांनी मुंबईची नाकाबंदी करण्याचा इशारा जरी जरांगे यांनी दिला असला तरी या आंदोलनाच्या दबावाखाली जर सरकारने चुकीचा निर्णय घेतला तर ओबीसी समाजही गप्प बसणार नाही. आम्हीही आमच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करू असा इशारा यावेळी दिला.