सांगली : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सांगलीत राजकीय, सामाजिक संघटनांकडून मंगळवारी निषेध करण्यात आला. काँग्रेसच्यावतीने काँग्रेसभवन येथे, शिवसेना शिंंदे गटाने स्टेशन चौक येथे अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध करत अतिरेकी कारवायांचा तीव्र धिक्कार केला, तर शिवप्रतिष्ठानच्यावतीने दुचाकी रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना पश्चिम बंगालमधील ममता सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

शिवप्रतिष्ठानच्यावतीने शहरात दुचाकी रॅली काढत अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेली रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाप्त झाली. शिवप्रतिष्ठानच्यावतीने संस्थापक संभाजी भिडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यामध्ये पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचाही निषेध करण्यात आला. संसदेने वक्फ विधेयक मंजूर केल्यानंतर अल्पसंख्याक हिंदूवर हे अत्याचार होत आहेत. हे रोखण्यास ममता सरकार कमी पडत असल्याने राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

जम्मू काश्मीर खोऱ्यात पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भाजप मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने बुधवारी सकाळी माजी पालकमंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जाहीर निषेध करण्यात आला. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, नूतन मंडल अध्यक्ष अनिता हारगे, चैतन्य भोकरे, मयूर नाईकवाडे, बंडोपंत कुलकर्णी, अनघा कुलकर्णी, रूपाली गाडवे, कपिल पाटील, गायत्री सातपुते, साधना माळी, सौ. ज्योती मगदूम, सीमा मगदूम यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना शिंदे गटाच्यावतीने स्टेशन चौकामध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. भ्याड हल्ल्याचा निषेध करत अतिरेक्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर मोदी सरकारने द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, रावसाहेब घेवारे, सुनिता मोरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काँग्रेसच्यावतीने पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, अतिरेक्यांना धर्म नसतो. दहशतवाद्यांना केंद्राने जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे. यावेळी अय्याज नायकवडी, आप्पासाहेब पाटील, अजिज मेस्त्री, प्रा. एन.डी. बिरनाळे, बिपीन कदम, अल्ताफ पेंढारी, मयूर पाटील, वसीम रोहिले, योगेश जाधव, सचिन चव्हाण, अजित ढोले आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी सांगली जिल्ह्यातून २४ नागरिक गेलेले असून ते सुरक्षित आहेत. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला आहे. सर्व पर्यटक सुरक्षित असून ते श्रीनगर आर्मी कॅम्पमध्ये आहेत. सदर पर्यटकामध्ये सांगली शहर-४ कडेगाव- ५ पलूस-८ मिरज-७ असे एकूण २४ पर्यटकांचा समावेश आहे.

अशोक काकडे, जिल्हाधिकारी