सांगली : जाती व्यवस्थेविरूध्द साहित्यिकांनी आज बोलण्याची गरज आहे. शाळेत खिचडी वाटप करीत असतानाही जात नोंदवणे ही विकृती असून यातून भयानक भविष्य निर्माण होईल असे वक्तव्य भाष्यकवी रामदास फुटाणे यांनी केले. कवी भीमराव धुळूबुळू यांच्या ‘काळजाचा नितळ तळ’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन शुक्रवारी सायंकाळी सांगलीत एका कार्यक्रमात श्री. फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पत्रकार विजय चोरमारे होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, आज स्वातंत्र्याला शंभर वर्षे झाली तरी जात नोंदवली जाते. या व्यवस्थेविरूद्ध साहित्यिकांनी उघडपणे बोलण्याची आणि लिहिण्याची आज गरज आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष याबाबत काहीच बोलत नाहीत ही शोकांतिका आहे. यावेळी त्यांनी काही भाष्यकविता सादर केल्या. काळजाचा नितळ तळ या काव्य संग्रहामध्ये मध्यमवर्गियांची होत असलेली घुसमट सोप्या शब्दात मांडली आहे.
हेही वाचा : कुणबी शब्दाची लाज वाटते त्यांनी शेती विकून चंद्रावर जावे – जरांगे पाटील
प्रारंभी महेश कराडकर यांनी स्वागत केले, तर प्रतिभा प्रकाशनचे धर्मवीर पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी चित्रकार अन्वर हुसेन, रवि बावडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास डॉ. विनोद परमशेट्टी, महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, जेष्ठ समिक्षक अविनाश सप्रे, अरूण म्हात्रे, गौतमीपुत्र कांबळे आदीसह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्र संचलन वर्षा चोगुले यांनी केले तर अभिजित पाटील यांनी आभार मानले.