सांगली : शांती, समाधान यासाठी जग भारताकडे आशेने पाहत आहे. भविष्यात भारत महासत्ता असेल, मात्र महासत्ता बनणार नाही. वसुधैव कुटुंबकम ही आपली मूळ विचारधारा आहे. हा भगवद्गीतेतील विचार असून लोकमान्यांनी या विचारधारेप्रमाणे जीवन व्यतित केले. हीच विचारधारा कायम ठेवत आपणाला जायचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी सांगलीत केले. लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी वर्ष शुभारंभानिमित्त डॉ. भागवत यांचे जाहीर व्याख्यान चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा : आमदार सोळंकेंच्या घरावर हल्ला; १७ जणांना जामीन
यावेळी ते म्हणाले, आपली मूळ विचारधारा सर्वांना सोबत घेऊन प्रगती साध्य करायची हीच आहे. आमचे कोणीही शत्रू नाहीत. सर्व समाजाची उन्नती झाली पाहिजे ही भूमिका घेऊन पुढे वाटचाल करायची, यासाठी लढाई ही करावीच लागणार आहे. मात्र, आमचा लढा हा प्रथम षढरिपूबरोबरचा आहे. तो साध्य केला तरच उन्नतीचा मार्ग खुला होणार आहे. लोकमान्य टिळकांचे आचार-विचार आजही प्रेरणादायी ठरतात ते त्यांनी प्रथम राष्ट्राचा विचार केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्यांदा त्यांनी स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क असल्याचे सांगून त्या दिशेने विचार मांडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर समाजाबाबत व्यापक दृष्टी असलेले लोकमान्य पहिले नेते होते. यामुळे स्वत:मध्ये असलेल्या शक्तीला ओळखून आपण सुखी, समाधानी जगासाठी प्रयत्नशील राहणे हेच आपले कर्तव्य आहे.
हेही वाचा : VIDEO : “एकनाथ खडसेंनी पक्षात राहून चोऱ्या केल्या, आर्थिक घोटाळे केले म्हणून…”, गिरीश महाजनांची टीका
आज जग भारताकडे आशेने पाहत आहे. कारण हिंसा, युद्ध, कलह ही मानवी जीवन सुखी होण्यातील अडसर आहेत. आमच्या सनातन धर्माने समाधानी राहण्यासाठी जी तत्वे सांगितली आहेत. त्याचे सार लोकमान्यांनी गीतारहस्याच्या माध्यमातून सांगितले आहे. धर्म म्हणजे केवळ पूजापाठ, कर्मकांड असे मी मानत नाही, तर सत्य, करूणा, विकारहिन वागणे आणि शांती, समाधानासाठी परिश्रम करणे म्हणजे धर्म होय असेही डॉ. भागवत यांनी सांगितले.