सांगली : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आता स्फोटक बनू लागल्याने जिल्ह्यातील खासदार व आमदार या लोकप्रतिनिधींच्या घरासह पक्ष कार्यालयास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र बनत चालले आहे. मराठवाड्यामध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासकीय इमारती यांना कार्यकर्त्यांकडून लक्ष्य बनविले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या सांगली व पेड येथील निवासस्थान, खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव येथील निवासस्थानासह यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या निवासस्थान व कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच भाजपसह संवेदनशील पक्षांच्या कार्यालयांसमोरही पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा : “बाप रुग्णालयात असताना पोरगा लंडनमध्ये…”, भाजपाचा उद्धव ठाकरेंना सवाल; म्हणे, “बाळासाहेबांना होडीत सोडून…!”
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी ही दक्षता असल्याचे सांगली पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मराठा आंदोलन तीव्र होत असल्याचे दिसत आहे. विविध गावात मशाल मोर्चा, साखळी उपोषण सुरू आहेत. कसबे डिग्रज येथे मंगळवारी तिरडी मोर्चा काढून निषेध करण्यात आला. सांगली-इस्लामपूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर मणेराजुरीमध्ये चौकातील नेत्यांच्या छायाचित्राला व बसवरील छायाचित्राला काळे फासून निषेध करण्यात आला. बेडग येथे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला. जतमध्ये महामार्गावर रास्ता रोको करण्यात आल्याचे गुहागर-विजयपूर मार्गावरील वाहतूक काही काळ खंडित झाली होती. सांगली मिरजेसह अनेक गावात कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.