सांगली : गर्दीची ठिकाणे, बाजार, वाहनतळावर लावण्यात आलेल्या दुचाकींची चोरी करून त्या विक्री करणाऱ्या भिलवडी येथील तरुणाला अटक करून त्याच्याकडून साडेसहा लाखांच्या चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी मंगळवारी दिली. या दुचाकी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेल्या होत्या.
जिल्ह्यात रोज दोन ते चार दुचाकींची चोरी होत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दुचाकी परत मिळेलच याचीही शाश्वती नसल्याने दुचाकीधारकांमध्ये चोरीची भीती कायम होती. दुचाकींच्या चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तैनात केली होती. सांगलीवाडीतील सिद्धिविनायक चौक येथे एक व्यक्ती दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाल्यानंतर सापळा लावला असता, सुदीप अशोक चौगुले (वय ३७, रा. भिलवडी, ता. पलूस) हा विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आला. त्याला ताब्यात घेतले असता, त्याने दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. अधिक चौकशी केली असता, त्याने चोरीच्या दुचाकी वसगडे येथील शेतात ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तेथे छापा मारून नऊ दुचाकी हस्तगत केल्या. अधिक चौकशीत त्याने आणखी १२ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली असून, त्याही पोलिसांनी हस्तगत केल्या. या दुचाकींचे मूल्य ६ लाख ६३ हजार रुपये आहे.
हेही वाचा : डिसेंबरअखेर राज्यात किती साखर उत्पादन ? जाणून घ्या, विभागनिहाय स्थिती आणि एकूण उत्पादनाचा अंदाज
त्याने भिलवडी, पलूस, सांगली, चिंचणी वांगी, कडेगाव, तासगाव, आष्टा आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकींची चोरी केली होती. त्याने आठवडा बाजार, वाहनतळ, मद्यालये आदी ठिकाणांहून या दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली.