सांगली : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने कोयनेतून होत असलेला पाण्याचा विसर्ग निम्म्याने कमी करण्यात येत असल्याने सांगलीचा पूरधोका टळला आहे. मंगळवारी दुपारपासून कृष्णेचे पाणी पात्रात परतण्याची शक्यता आहे. दुपारी बारानंतर १० हजार, पाच नंतर १० आणि रात्री आठनंतर १० हजार असा एकूण ३० हजार क्युसेकचा विसर्ग कमी करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आता ओसरला असून, कोयनेतून करण्यात येत असलेला ५२ हजार १०० क्युसेकचा विसर्ग आज कमी करण्यात आला. रात्री आठ वाजता वक्र दरवाजे चार फुटांपर्यंत खाली करून २० हजार सांडव्यातून आणि २ हजार १०० पायथा विद्युतगृहातून विसर्ग करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाच्या पूरनियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.
पश्चिम घाटात झालेल्या संततधार पावसामुळे सांगलीला निर्माण झालेला पूरधोका टाळणे कर्नाटक, महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या योग्य समन्वयाने शक्य झाले आहे. सांगलीतील पाणीपातळी संथगतीने कमी होत असली, तरी महापुराचा धोका तूर्त टळला आहे. आयर्विन पुलाजवळ सोमवारी दुपारी पाणीपातळी ३८ फूट ११ इंचांवर पोहोचली आहे.
पश्चिम घाटाच्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असला, तरी त्या मानाने पावसाचे प्रमाण कमी आहे. गेल्या २४ तासांत कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कोयना येथे ९३, तर चांदोली येथे ४९ मिलिमीटर पाऊस पडला. चांदोलीमध्ये सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २९.०९, तर कोयनेमध्ये ८६.३४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या अलमट्टी धरणातील विसर्ग एक लाख क्युसेकने कमी करून अडीच लाख क्युसेक करण्यात आला आहे. धरणात ३ लाख ३६०८ क्युसेकची आवक असून, पाणीसाठा ७८.०३६ टीएमसी आहे.
शहरातील आयर्विन पूलाजवळ रविवारी सकाळी ४० फूट म्हणजे इशारा पातळीवर असलेली पाणी पातळी आज दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ १३ इंचांनी उतरली. कोयनेतून विसर्ग कमी केल्याने पाणी पातळी आणखी वाढण्याची तूर्त शक्यता नसल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. तथापि, सांगलीतील सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लॉट, काकानगर, कर्नाळ रोड आदी ठिकाणी पुराचे पाणी अद्याप आहे. मगरमच्छ कॉलनीतील पाणी ओसरू लागले आहे.
हेही वाचा : पाऊस न पडताच पंढरपूरला पूर! उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग; चंद्रभागा धोका पातळीबाहेर
जिल्ह्यात सरासरी २.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक १०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अन्य ठिकाणी झालेला पाऊस असा – मिरज १.७, इस्लामपूर ४.४, विटा ३.२, कवठेमहांकाळ १.४, पलूस २.६, कडेगाव २.४ असा पाऊस नोंदला गेला. जत, आटपाडी येथे पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे.
© The Indian Express (P) Ltd