सांगली : पत्नीला नांदण्यास पाठविण्यासाठी आणि जाचहाट केल्याचा गुन्हा मागे घेण्यासाठी दीड लाख रूपयांची मागणी करून ती मागणी पूर्ण न केल्यास समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी पंचांनी दिल्याची तक्रार आष्टा पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती शुक्रवारी मिळाली. श्रीमती कोमल संजय नंदीवाले यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात पती संजय नंदीवाले व सासू यल्लुबाई यांच्या विरूद्ध जाचहाट व छळ होत असल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यापासून त्या माहेरीच वास्तव्यास आहेत.
समाजातील पंचासमोर तडजोड करून पत्नी कोमल यांना सासरी नांदण्यास आणण्यासाठी वाटाघाटी करण्याकरिता संजय नंदीवाले समाजाचे पंच लक्ष्मण जाधव (रा. ढवळी ता. वाळवा) यांच्या घरी गेले होते. त्यावेळी पंच जाधव, लक्ष्मण नंदीवाले, रा. दानोळी व पांडूरंग नंदीवाले, रा. कोथळी या तिघांनी पत्नीची पोलीस ठाण्यात दाखल असलेली तक्रार मागे घेण्यास सांगण्यासाठी आणि पत्नीला सासरी नांदवण्यास पाठविण्यासाठी दीड लाख रूपयांची मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास जातीतून बाहेर काढून कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल अशी धमकी दिली. या प्रकरणी संजय नंदीवाले यांनी लक्ष्मण जाधव, लक्ष्मण नंदीवाले आणि पांडूरंग नंदीवाले या तिघांविरूध्द आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.