सांगली : देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका संशयित गुन्हेगाराला खानापूर तालुक्यातील घानवट येथे अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जिवंत काडतूसांसह तीन पिस्तूल हस्तगत करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी रविवारी सांगितले.
अमोल विलास खरात (वय २९ रा. दहिवडी, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीस दप्तरी गुन्हेगार अशी त्याची नोंद असून तो घानवट येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचला होता. तो आल्यानंतर पोलीसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये तीन देशी बनावटीची पिस्तुले आढळली. तसेच १० काडतुसेही आढळून आल्याने पोलीसांनी घातक हत्यारे जप्त केली आहेत. त्यांची किंमत दीड लाख रूपये आहे.
दरम्यान, दुचाकीवरून मोपेडला अडकवलेली बॅग लंपास करणार्या साहिल सलिम शेख (वय २७ रा. सांगली) याला विश्रामबाग पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील पर्स, सोन्याचे मंगळसूत्र व चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा ८५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.