सांगली : पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या मिरज मतदार संघामध्ये प्रा. मोहन वनखंडे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाजपबरोबर महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर झाल्यानंतर या राजकीय नाट्याचा दुसरा अंक सुरू होण्याची प्रतीक्षा सध्या आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सावलीसारखे पालकमंत्री खाडे यांच्यासोबत प्रा. वनखंडे वावरत होते. मात्र, राज्यात अडीच वर्षांपूर्वी सत्ताबदलानंतर खाडे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आल्यानंतर दोघामध्ये अंतर वाढत गेले. यातून त्यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची साथ मिळत गेल्याने सवता सुभा मांडला. या जोरावर त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणीही केली. मात्र, पालकमंत्री खाडे यांना वगळून अन्य नावाचा विचार भाजपकडून होणार नाही हे लक्षात येताच, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाचा जाहीर मेळावा घेऊन त्यांना आपली ताकद दाखविण्याचा सल्ला काँग्रेसच्या नेते मंडळींनी दिला आहे. यासाठी त्यांची सध्या धावपळ सुरू आहे. हा मेळावा काँग्रेसचा असणार की महाविकास आघाडीचा असणार हे अजून स्पष्ट नसले तरी तीनही मित्रपक्षांचा मेळावा असावा असा प्रयत्न सुरू आहे. या निमित्ताने प्रचाराचा प्रारंभ करता येऊ शकेल, असा व्होरा काँग्रेस नेत्यांचा दिसत आहे.
मात्र, वनखंडे यांना आयात करून उमेदवारी देण्यास काँग्रेसमधून तीव्र विरोध होऊ लागला आहे. वनखंडे वगळता अन्य आठ जणांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. या सर्वांनी वनखंडे यांना वगळून अन्य कोणीही चालेल, अशी भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात आले. चंद्रकांत सांगलीकर यांनी वनखंडे यांना उमेदवारी दिल्यास आपली बंडखोरी असेल, असा इशाराही दिला आहे. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून सिद्धार्थ जाधव, तानाजी सातपुते यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेने सांगली, खानापूर आणि मिरज या तीन मतदार संघासाठी आग्रह धरला आहे. तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून बाळासाहेब वनमोरे, माजी आमदार राजू आवळे आदींसह पाच जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे.
हेही वाचा : जयंत पाटील यांचा प्रचार करणार नाही – जितेंद्र पाटील; काँग्रेसच्या बळकावलेल्या इमारतीवरून वाद
जिल्ह्यात आठपैकी काँग्रेसकडे दोन, राष्ट्रवादीकडे (शरद पवार) तीन जागा आहेत. राज्याच्या राजकारणात ताकद दाखविण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना म्हणजे आमदार जयंत पाटील व विश्वजित कदम यांना जागा वाढविण्याची गरज आहे. यामुळे आघाडीच्या जागा वाटपात मिरज, खानापूर आणि सांगली या तीन जागांसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये मोठी चढाओढ आहे. यातून मिरजेची जागा कोणाच्या वाट्याला येते हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. यानंतरच भाजपमधून बाहेर पडून काँग्रेसच्या वळचणीला आलेल्या प्रा. वनखंडे यांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे. भाजपमध्ये असताना मित्र असलेले आता मदतीला येतीलच याचीही खात्री नसल्याने नवे मित्र शोधावे लागणार आहेत.