सांगली : परमिट रूममध्ये दारू देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या तरूणाच्या खून प्रकरणी दोन संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने २४ तासांत अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी मंगळवारी दिली. आष्टा येथील सनशाईन परमिट रूम व बारमध्ये सोमवारी रात्री खूनाची ही घटना घडली होती.
सोमवारी रात्री भाजी बाजारानजीक असलेल्या सनशाईन परमिट रूम व बिअर बारमध्ये दारू मागण्यावरून वैभव बाळू घस्ते (वय १९ रा. साठेनगर) याच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. या घटनेनंतर त्याला तात्काळ खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा : “ठाण्यातील सभा म्हणजे माझ्या विरोधातील…”, मनोज जरांगेंच्या ठाणे दौऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
या प्रकरणातील संशयित अंकित नरेश राठोड (वय २१ रा. गांधीनगर मूळ गाव रामपूर, जि. हरडोई उत्तर प्रदेश) व प्रतिक भरत जगताप (वय २९ रा. शिराळकर कॉलनी मूळ गाव मदनसुरी, ता. निलंगा, लातूर) या दोघांना सांगली इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मी फाटा येथे दुचाकीवरून जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संशयावरून ताब्यात घेतले.
हेही वाचा : “गृहखाते सांभाळण्यात फडणवीस नापास”, सुषमा अंधारेंची टीका, म्हणाल्या, “मुख्यमंत्री बग्गीतून शेतात जातात…”
त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता दारूची मागणी केल्यानंतर तरूणाने दारू देण्यास नकार दिला, त्यामुळे त्याच्यावर चाकूने वार केले, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. संशयितांना अटक करून अधिक तपासासाठी आष्टा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.