सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेच्या रविवारी झालेल्या वार्षिक सभेत अंडीफेक झाल्याने गदारोळ माजला. घोषणा-प्रतिघोषणांनी नेहमीप्रमाणे बँकेची सभा यंदाही गाजली. सत्ताधारी गटाच्या मनमानी कारभाराचा निषेध करीत विरोधी गटाने समांतर सभा घेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय नामंजूर असल्याचे जाहीर केले, तर सभागृहात अंडीफेक करून गोंधळ माजवणार्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी जाहीर केले.
गतवर्षी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पुरोगामी सेवा मंडळाचा पराभव करून स्वाभिमानी मंडळ सत्तेवर आले आहे. आज वार्षिक सर्वसाधारण सभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली डेक्कन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने सभा गाजणार असल्याचेच अंदाज व्यक्त केले जात होते. यानुसार मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये सभा सुरू होताच, विरोधकांनी घोषणाबाजी करीत लाभांशापैकी १ कोटी ५४ लाखांचा निधी इमारतीसाठी वर्ग करण्यास विरोध दर्शवला.
हेही वाचा : “अर्थखातं कधीपर्यंत टिकेल, माहीत नाही”, अजित पवारांच्या विधानावर बावनकुळेंची प्रतिक्र…
विरोधकांनी फलक हातात घेत विरोध दर्शवला त्यावेळी त्याला विरोध म्हणून सत्ताधारी गटाकडूनही फलकबाजी तसेच घोषणाबाजी सुरू झाली. यावेळीच व्यासपीठाच्या दिशेने अंडी भिरकावण्यात आली. यातून गोंधळ अधिक वाढत गेला. गोंधळानंतर विरोधकांनी एकत्र येत सभागृहाबाहेर समांतर सभा घेऊन सत्ताधारी गटाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. सभासदांच्या हक्कांच्या लाभांशावर डल्ला मारण्याचा डाव असल्याचा आरोप करीत या ठरावाला विरोध केला. यावेळी बँक बचाव कृती समितीचे यु.टी. जाधव, सदाशिवराव पाटील, किरण गायकवाड, माणिक पाटील, शशिकांत बजबळे आदींच्या नेतृत्वाखाली निषेध करीत सभागृहात सत्ताधारी गटानेच अंडी फेक करून सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही करण्यात आला.
हेही वाचा : “अपात्रतेबाबतच्या कारवाईसाठी लागेल तेवढा वेळ घेणार”, नार्वेकरांच्या वक्तव्यावर असीम स…
याच दरम्यान अध्यक्ष शिंदे यांनी सभागृहात विषय पत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन करीत इमारतीसाठी निधी वळविण्याच्या ठरावाला अनुमोदन असल्याचे सांगितले. तसेच सभासद मृत संजीवनीसाठी वर्गणी वाढीलाही सभासदांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तर सभागृहात अंडी फेक करणार्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव यावेळी पारीत करण्यात आला. यावेळी संचालक मंडळाचे सदस्य व सत्ताधारी गटाचे समर्थक शिक्षक यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सर्व विषय मंजूर असल्याचे सांगितले. शेवटी उपाध्यक्षा अनिता काटे यांनी आभार मानले.