सातारा : सातारा जिल्ह्यातील ४५ गावे व २९८ वाड्या तहानलेल्या आहेत. ६९ हजार ८७२ नागरिक व ४२ हजार ७४७ जनावरांना ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एप्रिल महिन्यातच इतक्या टँकरने पाणी दिले जात असताना मे महिन्यात भीषणता आणखी वाढणार आहे.सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस तीव्र उन्हाळा जाणवू लागल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्हाच्या तडाख्याने भूजल पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे, विहिरींनी तळ गाठला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणी टंचाईच्या संकटाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची मागणी वाढली असल्याने टंचाईग्रस्त भागात प्रशासनाने टँकर सुरू केले. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागल्याने भूजल पातळीत घट झाली आहे. तसेच पाण्याचे स्त्रोतही आटू लागल्याने जिल्ह्यात टंचाईचा प्रश्न गंभीर होवू लागला आहे.

मे महिन्यात उन्हाची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरची मागणी वाढल्यास प्रशासनाला पाण्यासाठी आणखी पुरवावे लागणार आहेत. माणमध्ये सुरुवातीला शासकीय टँकरनेच पाणीपुरवठा करण्यात येत होता. पण, टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असल्याने खासगी टँकरही सुरू करावे लागलेत. सध्या ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये शासकीय १० आणि खासगी २० टँकरचा समावेश आहे. तसेच पाच विहिरी आणि एका बोअरवेलचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. माण तालुक्यातील बिजवडी, पांगरी, येळेवाडी, पाचवड, राजवडी, जाधववाडी, वडगाव, मोगराळे, मोही, डंगिरेवाडी, थदाळे, वावरहिरे, अनभुलेवाडी, दानवलेवाडी, हस्तनपूर, सोकासन, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, संभुखेड, खडकी, रांजणी, जाशी, पळशी, मार्डी, खुटबाव, पर्यंती, इंजबाव, भालवडी, पानवण, विरळी, वारूगड, कुळकजाई, टाकेवाडी, उकिर्डे, कोळेवाडी,

परकंदी, आंधळी, महिमानगड, दोरगेवाडी यासह २४ गावे व २९१ वाड्यांना ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.पाटण जाधववाडी, शिद्रुकवाडी (वरची तालुक्यातील जंगलवाडी, खळे), शिद्रुकवाडी (काढणे), भोसगाव (आंबुळकरवाडी), चव्हाणवाडी नाणेगाव असे १ गाव ४ वाड्यांना ४ टँकरने पाणी दिले जात आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव अंतर्गत गडगेवाडी, बालेघर अंतर्गत कासुर्डेवाडी, अनपटवाडी अशा १ गाव ३ वाड्यांना ३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यातील भंडारमाचीलाही टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.

जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा, फलटण, वाई, पाटण, जावली व महाबळेश्वर तालुक्यांतील ४७३ गावे व ६५७ वाड्यांमध्ये पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता गृहीत धरून १४ कोटी ६१ लाख ९० हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा</p>