सातारा: दुसरीत शिकत असलेल्या चिमुरडीवर ज्येष्ठाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना खटाव तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. संशयित आरोपीला पकडण्यात आले असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिलीप हरिबा जाधव (वय ६३, रा. औतरवाडी, ता. खटाव) असे संशयिताचे नाव आहे. संबंधित मुलीला घेऊन तिची आई शाळेत निघाली होती. यादरम्यान रस्त्यातच संशयित जाधव भेटला. त्याने आपण शाळेकडेच निघालो आहे, असे सांगून मुलीला आपल्या दुचाकीवरून घेऊन गेला; पण तो शाळेत पोहोचण्याऐवजी मुलीला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. त्याने तिथे तिच्यावर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

मुलीला दुसऱ्या दिवशी त्रास होऊ लागल्याने तिला दवाखान्यात उपचारांसाठी नेले असता तिने सगळी हकिकत सांगितली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मायणी (ता. खटाव) पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिलीप जाधव याच्यावर बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे करत आहेत.

हेही वाचा : “स्थानिक नेत्यांनी आरोपीला मदत केली, पण आम्ही…”, पुण्यातील वानवडी येथील अत्याचार प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीचा

संशयित दिलीप जाधव याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात २००८ साली खुनाचा गुन्हा, तर विटा पोलीस ठाण्यात चोरी व महिलांची छेडछाड काढल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. जाधव याची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याने त्याच्यावर तत्काळ कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.