सातारा: महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावळीत पावसाची संततधार सुरु आहे. महाबळेश्वर येथील पावसाने या हंगामातील ५० इंचाचा टप्पा आज पूर्ण केला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होत आहे. अनेक ठिकाणी पावसाची उघडझाप मात्र सुरू आहे. काही भागात पावसाने अद्यापही जोर पकडलेला नाही. महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा लेक काठोकाठ भरला आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन व पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. मागील महिन्याभरापासून बरसणाऱ्या पावसाने महाबळेश्वर येथे पन्नास इंच पाऊस झाला. १ जूनपासून कमी अधिक पाऊस बरसत आहे. महाबळेश्वर येथे आज ५४.९ मिमी पावसाची नोंद झाली. यावर्षी या हंगामातील एक महिन्यात पावसाने ५०.८०७ इंचाचा (१२९०.५० मिमी)टप्पा आज पार केला. या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेल्या वेण्णा तलाव काठोकाठ भरला आहे. महाबळेश्वर येथे दाट धुके, थंड वातावरण अन् पावसाच्या सरी अंगावर झेलत पर्यटक वेण्णा लेक भरल्याने तलावात पर्यटक बोटींग करू लागले आहेत. संपूर्ण जून महिन्यात कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरू आहे. जुलैच्या सुरवातीपासून पावसाने जोर धरल्याने महाबळेश्वर पाचगणी,सातारा तालुक्यातील व जावळी, वाईचा पश्चिम भाग,कास पठार परिसरातील नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. या पावसामुळे महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णालेक भरला आहे. तलाव पूर्णपणे भरल्याने पावसाळी हंगामात पर्यटक बोटींगचा आनंद घेऊ लागले आहे.
हेही वाचा : “राज्याचे मुख्यमंत्री गंभीर माणूस नाहीत, खुर्ची वाचवणं हेच…”, नाना पटोलेंची मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक टीका
शहरातील संततधार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर वर्षा पर्यटनासाठी पर्यटनाची देखील वीकएंडला रेलचेल वाढली आहे. पर्यटक हे दाट धुकं, रिमझिम पाऊस व थंडीमध्ये देखील पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत.वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध लिंगमळा, केटस् पॉईंट अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. शहरातील अनेक कापड दुकानांमध्ये स्वेटर, ब्लॅकेट्स, जॅकेट, टी शर्ट अश्या वस्तूंचा सेल लावण्यात दुकानांमध्येही झुंबड उडत आहे.