वाई : नाताळ आणि विकेंडच्या सलग सुट्ट्यांमुळे पुणे- सातारा महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे . खंबाटकी घाटात अनेक वाहने बंद पडून वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग व सातारा पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत. आज शनिवार, रविवार आणि सोमवार नाताळ आणि विकेंडच्या शाळा, महाविद्यालयांना व सरकारी खाजगी कार्यालयांना सलग तीन सुट्ट्या आल्याने मुंबई पुण्यातून अनेक जण आपल्या गावाकडे आणि महाबळेश्वर पाचगणीकडे पर्यटनासाठी गर्दी करत आहेत.
मोठ्या प्रमाणात वाहने महामार्गावर आल्याने खेड शिवापूर पासून सातारा खिंडवाडी पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाहने असल्याने सीएनजी गॅस वरील वाहने खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात गरम होऊन बंद पडली आहेत. दरवर्षी नाताळ व नववर्षा निमित्त महाबळेश्वर, पाचगणीला पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. यावर्षीही आज सकाळपासून मोठी गर्दी झाली आहे. वाईतील महागणपती मंदिरात व काशीविश्वेश्वर मंदिरात बाहेरगावच्या भाविकांच्या व पर्यटकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटातही वाहतूक संथ आहे. तीनही दिवशी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : “जरांगे पाटील, छगन भुजबळांना हात जोडून विनंती…”, नेमकं उदय सामंत काय म्हणाले?
खंबाटकी घाट व महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड आणि जड वाहनांनी दुपारी बारानंतर घाटातून प्रवास करावा असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. अवजड वाहनांना घाट सुरू होण्यापूर्वी थांबविण्यात येत आहे.
मागील काही सुट्ट्यांच्या वेळी वाहतूक कोंडीमुळे सीएनजी गॅसवरील विद्युत वाहने रस्त्यावर आणि खंबाटकी घाटात
बंद पडल्याने वाहतूक शिरवळ येथील पंढरपूर फाट्यावरून लोणंद मार्गे साताराकडे वळवावी लागली होती. महामार्गावर महाबळेश्वर पाचगणीकडे हलकी वाहने यावेळी जास्त आहेत. वाहन चालकांचा प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत.