वाई : साताऱ्यातील महाविकास आघाडीने आगामी लोकसभा व आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येथे पार पडली. यावेळी हुकूमशाही सरकारच्या विरोधात व्यापक आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गाव आणि जिल्हा पातळीवर बूथरचना मजबूत करणे, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि जनसंवाद या विविध माध्यमातून संपर्क वाढवणे आदी महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे व श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली . राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये झालेल्या बैठकीला व पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सचिव नरेंद्र देसाई, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, सचिन मोहिते, प्रभाकर देशमुख, दीपक पवार, पारिजात दळवी, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार शिंदे म्हणाले, राज्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर करून प्रत्यक्षात मात्र फसवणूक केली जात आहे . विविध कार्यक्रमांतर्गत युवकांना केलेल्या शासकीय कामाची बिले मिळत नाहीत ही अत्यंत दुःखद बाब आहे . मागील वर्षी अवर्षण तसेच दुष्काळ सदृश्य परिस्थितीचे आजतागायत पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. यंदाही पावसाचा अनुशेष तसेच अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यासंदर्भात अत्यंत मामुली स्वरूपाच्या उपायोजना केलेल्या आहेत. कांदा खरेदी असो इथेनॉल बंदी, साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रखडलेल्या अनुदानाचा, साखर कारखान्यांना एफआरपी देण्याच्या विविध मुद्द्यांवर व्यापक जन आंदोलन उभे केले जाणार आहे.

हेही वाचा : “ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव”; छगन भुजबळांच्या आव्हानावर जरांगे म्हणाले, “जेलमध्ये…”

शरद पवार यांच्या सूचनेनुसार गाव पातळीवर व्यापक जनाधार निर्माण करणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधने, त्यांचे संघटन निर्माण करणे, तालुका कार्यकर्त्यांचे मेळावे भरवणे, कार्यकर्त्यांना राजकीय दृष्ट्या प्रशिक्षित करणे इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रात आणि राज्यात असणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या सरकारच्या विरोधात जनभावनात निर्माण करून व्यापक जनकल्याणाचा कार्यक्रम राबवणे इत्यादी गोष्टींवर एकमत झालेले आहे. त्या दृष्टीने आगामी लोकसभा निवडणुकांची रणनीती ठरली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा : देशात दहशत पसरवण्याचा प्रयत्न? बेहिशेबी रक्कम, धारदार शस्त्रे, स्मार्टफोन अन्…, NIA च्या धाडसत्रात काय सापडलं?

धरणग्रस्तांचे नेते डॉ भारत पाटणकर यांनी राजकीय व्यासपीठावर येण्यामागचे कारण सांगितले. पुनर्वसनाचे आणि सिंचनाचे प्रश्न राज्यात व जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या धरणग्रस्तांनी मोठ-मोठी जन आंदोलने केली. मात्र राज्यातले सरकार आंदोलनकर्त्यांची हाक ऐकायला तयार नाही. त्यामुळे अशा हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात एकत्र येऊन एक व्यापक जन चळवळ उभारण्याचा निर्णय झालेला आहे. जर या चळवळीच्या माध्यमातून शोषितांचे आणि वंचितांचे प्रश्न सुटणार असतील तर या चळवळीचा भाग बनून शोषितांना न्याय देण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे असे सांगितले.जनतेच्या विविध प्रश्नांच्या मुद्द्यावर व्यापक आंदोलन आणि यापुढे सातत्याने सातारा जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचे महामेळावे घेऊन एक मजबूत जनसंघटन तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In satara at wai mahavikas aghadi held meeting for upcoming satara lok sabha election css