वाई : रिक्षाचालक बापाच्या कष्टाला मुलीचा अनोखा सलाम. बापाला हट्ट करून लग्नाचे वऱ्हाड चक्क वीस रिक्षातुन नेले. मुलीचं बापावरील प्रेम पाहून लग्नदारी आलेल्या पाहुण्यांचे डोळे पाणावले. प्रत्येक बाप मुलांच्या सुखासाठी धडपडत असतो. आपल्या लेकीचं लग्न अगदी धुमधडाक्यात व्हावं, तिचं वऱ्हाड आलिशान गाडीतून जावं, अशी स्वप्ने रंगवत असतो . मात्र लेकीनेच आपल्या बापाच्या कष्टाची किंमत करत, ज्या रिक्षाच्या जोरावर आमचं आयुष्य घडवण्यासाठी, आयुष्यभर जे धडपडले, त्यांच्या त्याच रिक्षाला आलिशान गाडी बनवत, त्यातूनच आपल्या लग्नाचं वऱ्हाड नेण्याचा हट्ट आपल्या कष्टकरी बापासमोर धरला आणि चक्क रिक्षातूनच हे वऱ्हाड वाजत गाजत लग्नदारी पोहोचले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : छगन भुजबळांचं शरद पवारांवर शरसंधान; म्हणाले, “एवढी चिडचिड…!”

ही घटना आहे सातारा शहरालगत असलेल्या राजेवाडी गावची. विजय खामकर हे व्यवसायाने रिक्षा चालक आहेत, त्यांच्या सायली या लेकीचं लग्न सांगवड (ता.पाटण) येथील शुभम पाटील यांच्याशी ठरले. आयुष्यभर आपल्या बापाने रिक्षावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला, त्या रिक्षाच्या मिळालेल्या पैशांवरच माझे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याच पैशावर आज माझं लग्न देखील होतंय, अशी भावना उराशी बाळगणाऱ्या या लेकीने आपल्या कष्टकरी बापाला, त्याच्या कष्टाची परतफेड करून देण्यासाठीच, त्याच्या रिक्षालाच आलिशान गाडी बनवत आपल्या लग्नाचे वऱ्हाड चक्क रिक्षातूनच काढले.

हेही वाचा : “काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्यांना काँग्रेसने घाम फोडला”, पाच राज्यांच्या निवडणुकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

सातारा शहरालगत असलेल्या एका मंगल कार्यालयात हे वऱ्हाड तब्बल वीस रिक्षांतून आलं होतं. यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले होते, आणि म्हणूनच या रिक्षांतून आलेल्या वऱ्हाडाची पूर्ण साताऱ्यात जोरदार चर्चा सुरू आहे . या लेकीने, आपल्या कष्टकरी बापाच्या कष्टाला जणू अनोख्या पद्धतीने सलामच केलाय. अशीच काहीशी भावना सर्वांच्या मनात दिसून आली. बाप लेकीचे घट्ट प्रेम पाहून, लग्नदारी आलेल्यांचे डोळे मात्र पाणावले होते.

“वडिलांनी आम्हाला लहानपणापासूनच, रिक्षा चालवून जगवले. माझे शिक्षण केले. त्यांनी जे कष्ट घेतले त्यांच्या कष्टाची जाण मला आहे. त्यामुळे माझ्या लग्नाचं वऱ्हाड त्याच रिक्षातून नेण्याचा माझा हट्ट होता. त्यांनी सुरवातीला नाही म्हणाले पण नंतर वऱ्हाड रिक्षातून नेऊन त्यांनी माझा हट्ट पूर्ण केला”, असे सायली खामकर हिने म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In satara at wai wedding bridegroom travelled through 20 auto rickshaws css