सातारा: उदयनराजे समर्थक व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यातील आरोप प्रत्यारोप आणि वादवादीनंतर भाजपच्या जिल्हा कार्यालयात अखेर खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे छायाचित्र लावण्यात आले. आमदार जयकुमार गोरे हे जिल्हाध्यक्ष असताना सातारा शहरात विसावानाका परिसरात भाजपाचे जिल्हा कार्यालय सुरू झाले .या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार जयकुमार गोरे यांचेच छायाचित्र होते. सातारा शहरात कार्यालय असूनही खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे छायाचित्रच नव्हते. आमदार गोरे यांच्या कार्यकाळात हे कार्यालय सुरू झाल्याने त्यांच्या सूचनेनुसार कार्यालयाची अंतर्गत रचना करण्यात आली होती व प्रमुख नेत्यांचे व आमदार जयकुमार गोरे यांचे छायाचित्र होते. त्यानंतर धैर्यशील कदम यांच्याकडे भाजपचा जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे आली.
नुकताच जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष आणि देसाई व आमदार जयकुमार गोरे यांच्यात वाद रंगला असून देसाई यांनी आमदार गोरे यांना थेट आव्हान दिल्याने आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. सध्या देसाई शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने असल्याचे सांगितले जाते. उदयनराजेंना उमेदवारी मिळताना आमदार गोरे यांनी विरोधात भूमिका घेतली असा गौप्यस्फोट अनिल देसाई यांनी केला . यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादात धैर्यशील कदम यांनी उडी घेत उदयनराजेंच्या समर्थकांवर ‘बगलबच्चे’ असा उल्लेख केल्याने उदयनराजे समर्थक आक्रमक झाले होते. उदयनराजेंचे ‘मावळे’ असतात त्यांचे कधी कोणी ‘बगलबच्चे’ नसतात असे प्रत्युत्तर उदयनराजे समर्थकांनी दिले होते.याचा प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण धस्के यांनी पत्रक काढून निषेध नोंदविला होता. जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंचे छायाचित्र नसल्याबाबत विचारणा केली होती. त्यावर त्यांनी आमदार गोरेंच्या कार्यकाळात अंतर्गत सजावट झालेली आहे. मी कोणतेही बदल केलेले नसल्याचे सांगून वेळ टाळून नेली होती. मोठ्या वादावादी नंतर दोन्ही राजांचे छायाचित्र पक्ष कार्यालयात लावण्यात आले असून त्यासाठी जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे यांनी पुढाकार घेतला.
भाजपाच्या कार्यालयात उदयनराजे शिवेंद्रसिंहराजेंचे छायाचित्र नसल्याची खंत दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये होती. कार्यकर्ते नाराजी बोलून दाखवत होते . मात्र याबाबत जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे यांनी पुढाकार घेत खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे छायाचित्र कार्यालयात लावत याबाबतच्या चर्चांना आरोप प्रत्यारोपांना पूर्णविराम दिला. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी हे पॅचअप करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता दोन्हीही राजांची छायाचित्रे भाजप कार्यालयात झळकल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे