सातारा : महाबळेश्वर शहरातील हॅाटेल व्यावसायिकाला वाईन शॉप परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना मअहबळेश्वर येथे घडली आहे.हेमंत बाळकृष्ण साळवी असे या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे.याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात राज्य गुन्हे शाखेचे पुणे विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे यांच्यासह ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी पुणे विभाग आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक देवश्री मोहिते यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. यामध्ये महाबळेश्वर (साबणे रोड) येथील हॉटेल व्यावसायिक हेमंत बाळकृष्ण साळवी यांना राज्य गुन्हे अन्वेषण शाखा (पुणे विभाग) अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे, हनुमंत विष्णुदास मुंडे, विवेक पंडित यांनी वाइन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आश्वासन दिले.त्यासाठी एकूण अडीच कोटी रुपये खर्च येत असल्याचे सांगून वेळोवेळी संजय बाजीराव साळुंखे यांच्या मध्यस्थीने एकूण रक्कम १ कोटी ५० लाख रुपये रोख व चेकने वाई येथे विविध ठिकाणी स्वीकारली.
परंतु त्यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा परवाना मिळाला नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले.त्यानंतर संजय सांळुखे यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक, पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या चौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आला आहे.
त्यानुसार श्रीकांत कोल्हापुरे व हनुमंत मुंडे यांच्यासह नऊ जणांवर आपापसांत संगनमत करून शासकीय वाहनाचे लॉक बुकमध्ये खोट्या नोंदी करून, हॉटेल व्यावसायिक हेमंत साळवी यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये, श्रीकांत कोल्हापुरे, हनुमंत विष्णुदास मुंडे, विवेक पंडित, नीलेश पटेल, अभिमन्यू देडगे, राजन सूर्यभान सोनवणे, शकील हाजी मकबूल सय्यद, श्रीमती नजमा शेख व बाळू पुरी यांचा समावेश आहे.