सातारा : साताऱ्यातील मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील करोना उपचार केंद्रातील गैरव्यवहाराबाबत केलेल्या तक्रारीनुसार या संस्थेचे अध्यक्ष असलेले माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख आणि संस्थेशी निगडित पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, वडूज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत या संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याचिकेनुसार साताऱ्यातील मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात करोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले होते. या वेळी येथे हजारो लोकांवर उपचार करण्यात आले. यातील ३५ रुग्णांवर ते मृत असतानाही उपचार केल्याचे दाखवून शासनाचा निधी हडप केल्याची तक्रार यामध्ये करण्यात आली होती.
या प्रकरणात उच्च न्यायालयाने सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश दिला होता. उच्च न्यायालयाने आज याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश देताना आमदार जयकुमार गोरे यांच्यासह याचिकाकर्ते दीपक देशमुख हे संस्थेचे उपाध्यक्ष असल्याने त्यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्यचे अधिकारी देविदास बागल यांनी वडूज (ता. खटाव) पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वरील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : Manoj Jarange : “पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात सुपडा साफ करणार, तर मुंबईत…”, मनोज जरांगेंचा इशारा
सखोल चौकशी व्हावी
कोविडच्या काळात जनतेची गरज म्हणून मायणीतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर’ हे बंद पडलेले रुग्णालय सुरू केले. यातून शेकडो रुग्णांवर उपचार करण्यात आले. या याचिकेत सुरुवातीस दोनशे मृत रुग्णांवर उपचार करून पैसे हडपल्याचे म्हटले होते. आता हाच आकडा गुन्हा दाखल होताना ३५ दाखवला जात आहे. याचा सर्व सखोल तपास करावा आणि माझ्यासह जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी.
जयकुमार गोरे