वाई : नायगाव (ता खंडाळा) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना छगन भुजबळ व रूपालीताई चाकणकर यांनी अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. महाराष्ट्र सदनात छगन भुजबळ यांनी घोटाळा केला आहे. त्यांचा हात पवित्र स्मृतीस लागला म्हणून राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे औद्योगिक सेलचे अध्यक्ष बंडू ढमाळ व इतर कार्यकर्त्यांनी पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. यावेळी उपस्थित महिलांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. “जग कुठे चालले आहे आणि तुम्ही कुठे चालला आहात”, असे म्हणून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बळाचा वापर करून कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला.
हेही वाचा : सातारा : भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन, शरद पवार गट आक्रमक; दुग्धाभिषेकासह स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण
ज्या मनुवादी विचाराने सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यास विरोध केला, त्यांच्यावर विष्ठा फेकली, नाहक त्रास दिला, बदनामी केली, अशा लोकांनी आपले भ्रष्टाचाराचे आरोप लपवण्यासाठी लालसे पोटी व मंत्रीपदाच्या हव्यासापोटी त्यांच्याबरोबर जाऊन मंत्रीपद घेतले. त्यांनी पाप केलं आहे. त्यामुळे आम्ही आज सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला आहे. त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. त्यांनी पुढील वर्षी येथे येताना विचार करून यावे आणि सत्यशोधक समाजाचा इतिहास वाचून यावे. आमचा या ठिकाणी आलेल्या मुख्यमंत्र्यांना विरोध नाही. मात्र ज्यांनी तुरुंगवास भोगला आणि भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर झाले त्या छगन भुजबळ यांना आमचा विरोध आहे, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. संबंधित कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथे कोणत्याही जातीय आरक्षणाच्या आंदोलनाचा विषय नाही. आम्ही मराठा समाजाचे आहोत. परंतु सत्यशोधक समाजाच्या विरोधात जाऊन छगन भुजबळ यांनी काम केले म्हणून त्यांना विरोध करत हा दुग्धाभिषेक करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.