सातारा : सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतल्याने धोम, कण्हेर, उरमोडी, धोमबलकवडी, वीर धरणांतून नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. त्यामुळे कृष्णा, वेण्णा नदीपात्रातील पाण्याखाली गेलेले पूल मोकळे झाले. दरम्यान, विविध पुलांवर जलपर्णीचे ढीगच्या ढीग साचले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागातही पाऊस कमी प्रमाणात होता. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ होत नाही. त्यामुळे धरणांची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी सोडण्यात आलेला विसर्ग धरण व्यवस्थापनाने बंद केला आहे.
हेही वाचा : भीमा नदीतील विसर्ग घटला, पंढरीतील पाणी पातळी कायम; नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर
धोम बलकवडी धरणातून सकाळी ११ वाजल्यापासून सर्व सांडव्यांद्वारे सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. मात्र विद्युतगृहातून ३३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सर्व दरवाजांतून कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. उरमोडी धरणातून विसर्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे. मात्र विद्युतगुहातून साडेचारशे क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे. कण्हेर धरणातून वेण्णा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. मात्र कालव्यातील ३८० क्युसेक्स विसर्ग विद्युत गृहाद्वारे सुरू आहे. धोम धरणातूनही पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाई शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाली. महागणपती मंदिरासह सर्व मंदिरे खुली झाली. वीर धरणातूनही पाण्याचा विसर्ग आज सकाळपासून कमी करण्यात आला आहे. वीर धरणाच्या वरील भागातील नीरा देवघर धरण (९०.२७%), भाटघर धरण १००% तर गुंजवणी धरण (९०.०३%) भरलेली असल्याने व या सर्व धरणांतून विसर्ग कमी झाला असून वीर धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक देखील कमी झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व संख्या अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे.
मोठे प्रकल्प – कोयना ८०.९९ (८०.८९), धोम ९.६७ (८१.८६), धोम – बलकवडी ३.३३ (८४.०९), कण्हेर ७.७६(८०.९२), उरमोडी ८.०१ (८३.०१), तारळी ५.०२(८५.९६).